मधुरा कुलकर्णी
भारतीय वंशाची सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर हे दोघे अंतराळवीर १३ मार्च रोजी पृथ्वीवर परतणार ही आनंदाची बातमी होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय स्थानकावरून त्यांचे पृथ्वीवर परतणे पुढे ढकलले गेले होते. नासा आणि ‘स्पेसेक्स’च्या फाल्कन प्रक्षेपकाद्वारे स्थानकाच्या दिशेने झेपावणाऱ्या अवकाश कुपीचे प्रक्षेपण काही तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकले नव्हते; ते १५ मार्च रोजी झाले. सुनीता विलियम्स आणि तिचे सहकारी यांना परत आणायला गेलेले अंतराळयान कक्षेत पोहोचले असल्याची माहिती ‘नासा’ने दिली होती. या मोहिमेद्वारे ॲनी मॅकलेन, निकोल आयरस, जपानचे तकुया ओनिश आणि रशियाचे किरिल पेशकोव्ह हे चौघे अंतराळवीर अंतराळात गेले. परतीच्या प्रवासामध्ये नासाचे निक हाग, सुनीता विलियम्स, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांनी अंतराळयानामध्ये प्रवेश केला आणि अंतराळ स्थानक आणि या यानामधला दरवाजा बंद झाला. त्यानंतर ‘अनडॉकिंग’ची प्रक्रिया सुरू झाली आणि हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून विलग झाले. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर फ्लोरिडाजवळच्या समुद्रामध्ये हे यान उतरले. त्यानंतर रिकव्हरी टीम्सद्वारे या कॅप्सुल्समधून दोघा अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले. सरतेशेवटी, भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरूप परतले. स्पेसेक्सच्या यानाने सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतल्या तेव्हा आणखी एक विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला. नासाचे स्पेस शटल, सोयुझ यान, बोईंग स्टारलायनर आणि स्पेसेक्स क्रू ड्रॅगन अशा चार वेगवेगळ्या स्पेस कॅप्सुल्समधून अंतराळ प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या अंतराळवीर ठरल्या.
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन स्पेसएक्स ड्रॅगन पृथ्वीवर परतले ही आनंदाची बातमी आहे. याशिवाय त्यांच्याबरोबर नासाच्या क्रू ९ मोहिमेअंतर्गत अवकाशात गेलेले दोन अंतराळवीरही परतले आहेत. विलियम्स यांच्या प्रतिमा काही महिन्यांपूर्वी समोर आल्या तेव्हा त्यांचे वजन कमी झाल्याचे जाणवत होते. ही विस्तारित अंतराळ मोहिमेवरील अंतराळवीरांसाठी एक सामान्य समस्या असते. अंतराळात, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात राहताना शरीराची प्रकृती राखणे आव्हानात्मक असते. अशा वेळी शरीर पोषक तत्त्वांचे चयापचय कसे करते आणि ऊर्जेचा वापर कसा करते यावर बरेच काही अवलंबून असते. अशा अवस्थेत सुनीता विलियम्स यांचा अंतराळात वाढलेला मुक्काम ही चिंतेची बाब होती. तेव्हा विलियम्स यांचे गाल काहीसे खोलगट झाल्याचे दिसत होते. हे अनेकदा शरीराचे एकूण वजन कमी झाल्याचे लक्षण असते. यावरून विलियम्स यांना कॅलरीची कमतरता आहे, हे स्पष्ट जाणवत होते. अंतराळातील वास्तव्य वाढणे त्यांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरले असते. अंतराळवीरांना उच्च-उंचीवर राहताना शारीरिक परिणामांचा सामना करावा लागतो. त्यात बदललेल्या वातावरणात हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनमार्ग यांच्या कार्याचा समावेश होतो. याव्यतिरिक्त अंतराळ प्रवासामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे होणारे आजार अंतराळवीरांना अधिक असुरक्षित बनवतात.
अंतराळात पृथ्वीच्या निम्न कक्षेत फिरत असलेल्या अवकाश स्थानकांमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची स्थिती असते. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीर स्थानकांमध्ये अक्षरशः तरंगत असतात. अशा परिस्थितीत जगणे अत्यंत जिकिरीचे असते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे मानवी शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतात, हे सुनीता विलियम्स यांच्या ताज्या फोटोंमधून स्पष्ट दिसत होते. त्यामुळेच जगभरातील, विशेषतः भारतातील खगोलप्रेमी चिंतेत पडले होते, ते आता चिंतामुक्त झाले आहेत. भारतवंशीय अंतराळवीर सुनीता विलियम्स नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा अंतराळात मुक्काम केल्यानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. अंतराळात त्यांचे इतक्या दिवसांचे वास्तव्य पुढील काळात विशेष दक्षता घ्यायला लावू शकते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने शरीर, डोळे, डीएनएमध्ये बदल होऊ शकतात. आधीच्या अध्ययनात अंतराळात वाढलेल्या अशा वास्तव्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसले होते. दीर्घकाळ अवकाशात राहिल्याने सुनीता यांना भावनिक-मानसिक पातळीवर तणाव जाणवू शकतो. अंतराळवीरांना त्या अानुषंगाने प्रशिक्षण दिले जाते. तरीही समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अंतराळात गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने सुनीता यांचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाडांचीही स्थिती त्रासदायक राहू शकते.
दीर्घकाळ अंतराळात वास्तव्य करणाऱ्या सुनीता यांना उच्च पातळीवरील किरणोत्सर्गाला तोंड द्यावे लागू शकते. त्यातून भविष्यात त्यांना कर्करोग वा इतर व्याधी जडू शकतात. शरीरातील पेशी, डीएनएमध्येही परिवर्तन होऊ शकते. दीर्घकाळ बाहेरच्या जगाशी संबंध न राहिल्याने सुनीता यांना ‘स्पेसलाइट असोसिएटेड न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम’ला तोंड द्यावे लागू शकते. त्यात डोळ्यांच्या नसांवर दबाव पडतो, दृष्टी कमकुवत होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी, सुनीता यांना भविष्यातील संकटातून वाचण्यासाठी निगराणीखाली राहावे लागेल. ताकद राखण्यासाठी तसेच हाडांमधील बळकटी परत मिळवण्यासाठी कठोर प्रशिक्षणातून जावे लागेल. सुनीता यांच्या आधी अनेक अंतराळवीर अंतराळात दीर्घकाळ राहिले आहेत. रशियाचे वालेरी यांनी सर्वाधिक ४३७ दिवस राहण्याचा विक्रम नोंदवला होता. गेल्या वर्षी अमेरिकन अंतराळवीर फ्रँक ३७१ दिवसांच्या मुक्कामानंतर पृथ्वीवर परतले होते. त्यांच्या शरीरात अनेक व्याधी निर्माण झाल्याचे दिसले. दृष्टीसंबंधी समस्या, डीएनएमध्ये बदल, वजन कमी होणे, रोगप्रतिकारशक्तीत कमतरता असे बदल दिसून आले होते. त्यावरून अंतराळातील वास्तव्य वाढल्याचे काय दुष्परिणाम होतात याची कल्पना येऊ शकते.
१४ अंतराळवीरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात युनिव्हर्सिटी ऑफ ओटावाच्या संशोधकांना याबाबत माहिती मिळाली आहे. अभ्यासात समाविष्ट अंतराळवीरांमध्ये ब्रिटनच्या टिम पेक यांचाही समावेश होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सहा महिने घालवले आहेत, तसेच अंतराळात विविध विषयांवर संशोधनही केले आहे. या मोहिमेदरम्यान, अंतराळवीरांच्या रक्त आणि श्वासोच्छ्वासाचे नमुने घेण्यात आले. शरीरात कमी झालेल्या तांबड्या पेशींची संख्या मोजण्यासाठी असे करण्यात आले. या पेशी फुप्फुसांपासून संपूर्ण शरीरापर्यंत ऑक्सिजन पुरवतात. रोजच्या आयुष्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते. या संबंधातील अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि हॉस्पिटल फिजिशियन डॉ. गाय ट्रूडल म्हणतात, अंतराळात पोहोचल्यानंतर लाल रक्तपेशी नष्ट होत आहेत, हे आमच्या लक्षात आले. संपूर्ण मिशन दरम्यान ते सुरूच होते. मात्र, अंतराळात वजन जाणवत नसल्यामुळे तिथे असेपर्यंत ही फार मोठी समस्या भासत नाही. पृथ्वीवर परत आल्यानंतर सुनीता विलियम्स यांना अशक्तपणा आणि थकवा याची जाणीव होईल. शिवाय त्यांच्या स्नायूंची शक्तीही कमी होईल. अंतराळात दर सेकंदाला शरीरातून ३० लाख तांबड्या पेशी नष्ट होतात. जमिनीवर असताना केवळ दोन लाख पेशीच नष्ट होतात. मात्र, शरीर पुन्हा त्याची भरपाई करते. तसे न झाल्यास अंतराळ प्रवासी अंतराळात गंभीर आजारी पडतात. पण, शरीर सलग किती काळ या पेशींची कमतरता भरून काढण्यास सक्षम असते, याबाबत संशोधक ठाम नाहीत.
अभ्यासातून अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतरही ही समस्या दूर झाली नसल्याचे आढळले आहे. पृथ्वीवर परतल्याच्या एका वर्षानंतरही त्यांच्या शरीरातील तांबड्या पेशी वेगाने नष्ट होत होत्या. महिला आणि पुरुष या दोघांवरही अंतराळात याचा सारखाच परिणाम झाला. सुनीता विलियम्स बरेच दिवस अंतराळात राहिल्यामुळे तर ही बाब चिंतेची ठरते. त्यामुळे दीर्घकाळ लांबलेल्या अंतराळातील मुक्कामातून सुखरूप परतल्यावरही त्यांच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलांकडे भारतीयांचे लक्ष लागून राहणार आहे. ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या यशस्वी लँडिंगनंतर सुनीता विलियम्ससह सर्व अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले, त्यावेळी घरवापसीचा आनंद सुनीता विलियम्सच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. पृथ्वीवर परतल्यानंतर लगेचच सुनीता यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यानातून बाहेर आणत असताना त्यांनी ‘थँक यू’ हा शब्द उच्चारत नासा आणि संपूर्ण जगाचे आभार मानत पृथ्वीवर सुखरूप परत आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण जगातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करून लवकरच भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.