सतीश पाटणकर
कणाला थोर व्यक्तींची परंपरा लाभलेली आहे. तसाच उच्च संस्कृतीचा वारसाही लाभलेला आहे. गतकालीन लखलखती व्यक्तिरत्ने तरुण पिढीसमोर ठेवून तिच्यातील सुप्त चेतनाशक्ती जागृत करणे हा कोकण आयकॉन या नवीन सदराचा हेतू आहे. या सदरातील प्रत्येक व्यक्तिमत्त्व आपल्याला ऊर्जा देते, कार्यप्रवृत्त करते आणि आपला आत्मविश्वासही वाढवते.
बाळाजी विश्वनाथ भट हे मूळचे कोकणातील श्रीवर्धनचे. त्यांच्या घराण्याकडे दंडाराजपुरी व श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० सालापासून होती. दंडाराजपुरी तेथून जवळच जंजिरा त्यामुळे साहजिकच सिद्धीच्या त्रासाला कंटाळून बाळाजी देशावर आले. ताराबाई राजारामाची कर्तबगार पत्नी. राजारामाच्या मृत्यूनंतर आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसून पराक्रमाने ७ वर्षे औरंगजेबा बरोबर झुंज दिली. ताराबाई महाराणींचे सेनापती धनाजी जाधव यांच्याकडे बाळाजींनी चाकरी केली. ताराबाईंना शह देण्यासाठी औरंगजेबाच्या मृत्युपश्चात मोगलांनी शाहू महाराजांची १७०७ रोजी कैदेतून सुटका केली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये स्वराज्याच्या राजगादीसाठी संघर्ष सुरू झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून शाहू महाराजांना अनेक मातब्बर सरदारांचा पाठिंबा होता. ताराराणींचा पक्षही मजबूत होता. शाहू महाराज दिल्लीवरून साताऱ्यास येण्यास निघाले. वाटेत खानदेशात ते आले. तेथे धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, शंकरजी नारायण, सचिव यांना शाहू महाराजांनी पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. त्यासाठी बाळाजी भटांना बरोबर घेऊन जाधवराव शाहू महाराजांना भेटले. पुढे शाहू महाराज साताऱ्यास आले. बहिरोपंत पिंगळे हे त्यांचे पेशवे होते. त्यांच्याकडे लोहगड व राजमाची किल्ला होता.
मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे ताराबाईंच्या पक्षातील. आंग्रेनी शाहू महाराजांच्या बहिरोपंत पेशव्यास तसेच निळो बल्लाळ या चिटणीसास राजमाची किल्ल्यात कैद करून पुण्याजवळील असलेले लोहगड, राजमाची किल्ले ताब्यात घेतले होते. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ फौज घेऊन लोहगडाजवळ आले. आंग्रे ओळवण येथे त्यांना भेटले. कोकणातील असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्र्यांचे जवळचे संबंध होते. आंग्रे यांनी समंजसपणा दाखवून वाद मिटविला. पिंगळे यांच्यावर शाहू महाराज नाराज झाले होते. त्यांना दूर करून पेशवाई दुसऱ्याला देण्याचा त्यांचा विचार झाला. खानदेशातून महाराज साताऱ्यास येत असताना बाळाजी विश्वनाथ त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यातील कर्तेपणा पारखून महाराजांनी २७ नोव्हेंबर १७१३ रोजी पेशवे पद बाळाजींना बहाल केले. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे महाराष्ट्रातील सर्व पराक्रमी सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूने वळवून घेतले. पुढे बाळाजींनी दिल्लीपर्यंत स्वारी केली व सासवड येथून आठ वर्षांपर्यंत कारभार सांभाळला. बाळाजी पेशवे १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्त्वाचे पद. पेशवे म्हणजे पंतप्रधान. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते. बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले. दरबारातील श्रीपतराव व अष्टप्रधानांनी हे पद कोकणस्थांमध्ये न देण्याचा आग्रह धरला. पण शाहू महाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते, तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण होता. तसेच बाळाजी विश्वनाथांबरोबर सतत राहिल्याने बाजीरावांना युद्धाचा तसेच राजकारणाचा अनुभव प्राप्त झाला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला. १७ एप्रिल १७२० रोजी शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरांवाना बहाल केली. बाजीराव त्यावेळी केवळ २० वर्षांचे होते.
बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा, तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले. बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही. मराठेशाहीला नर्मदेच्या पलीकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच. दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले. बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली. बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला. पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला असावा. बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.