मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
सौमैया कॉलेजच्या त्या दिवसांमधल्या माझ्या दिग्गज गुरूंच्या आठवणी सर्वाधिक जवळच्या आहेत. मी तेव्हा पदवी स्तरावरील पहिल्या वर्षात शिकत होते. ते वर्ष १९८४-८५ असणार. पहिल्या सत्रात विश्राम बेडेकरांची ‘रणांगण’ ही कादंबरी अभ्यासक्रमात होती. ती शिकवत होते. वसंत दावतार सर मराठी विभागप्रमुख होते. सरांचा महाविद्यालयात एकंदरीत दराराच होता. तत्त्वनिष्ठ माणसाचा धाक सर्वांना वाटतो. सर पुढल्या सत्रानंतर निवृत्त झाले. त्यांच्या ‘आलोचना’चे महत्त्व त्या काळात समजावले ते आमच्या वसंत कोकजे सरांनी. दावतर सर कोकजे सरांना गुरुस्थानी होते. के. सी. महाविद्यालयात एम. ए.च्या वर्गात शिकत असताना दावतर सरांचे ते विद्यार्थी होते. सोमैया महाविद्यालयात एका टप्प्यावर वसंत ऋतू बहरला होता असे कोकजे सर म्हणायचे. एक वसंत दावतर, दुसरे वसंत पाटणकर आणि तिसरे कोकजे स्वतः!
प्रा. न. र. फाटक यांचे दावतर हे विद्यार्थी. गेल्या काही वर्षांत पीएच.डी.चे जे स्तोम माजले आहे त्यात आर्थिक गणित, पदोन्न्नती असा व्यावहारिक भाग अधिक आहे. शिक्षण, संशोधन, भाषा यांचा उत्कट विचार करणारी तत्त्वनिष्ठ माणसे माझ्या पूर्वीच्या पिढीत होती. त्यांनी हातचे काही राखून न ठेवता विद्यार्थ्यांना दिले. दावतर हे असे प्रतिभावंत तपस्वी होते. निवृत्तीनंतर देखाव्याचा सोहळा त्यांनी ठामपणे नाकारला. गुरुनाथ धुरीसारख्या मराठीतील कलंदर कवीला विभागात सामावून घेणे, सरकारी परिपत्रकांवर ताशेरे ओढणे, शुद्धलेखनाबाबत स्पष्ट भूमिका अशी त्यांची वैशिष्ट्ये मी कोकजे सरांकडून विद्यार्थिदशेत ऐकली. कोकजे यांनी दावतर सरांबद्दल एका लेखात लिहिले आहे, ‘‘प्रा. न. र. फाटकांनी दिलेले पाथेय दावतरांनी पचवलं. शेकडोंना लिहितं केलं. त्यामागे क्षणिक उत्तेजना नव्हती तर समीक्षेचे महामेरू निर्माण व्हावे ही तळमळ होती. दावतरांनी समीक्षेचा कुलधर्म निष्ठेने पाळला.’’
मोठ्या प्रकाशन संस्था किंवा भक्कम पाठबळ मागे असूनदेखील मासिके – नियतकालिके बंद पडतात. दावतर सरांनी ‘आलोचना’ हे समीक्षेला वाहिलेले मासिक निष्ठेने तब्बल २५ वर्षे चालवून ते प्रा. दिगंबर पाध्ये यांच्याकडे सोपवले. केंद्रस्थानी समीक्षा असणाऱ्या मासिकाचे वर्गणीदार व्हायला किती लोक तयार होणार? खेरीज यात जाहिराती देण्याकरिता किती जाहिरातदार उत्सुक असणार? पण या व्रतस्थ संपादकाने घेतलेला वसा टाकला नाही. खेरीज नाव न छापण्याचा आग्रह धरून समीक्षा प्रसिद्ध केली. ‘ठणठणपाळी’ टिकेसह वेगवेगळी टीकाटिप्पणी वेळोवेळी झेलली. ‘आलोचना’ मासिकाचा आर्थिक संसार सांभाळताना झालेली ओढाताण सोसली पण निग्रहाने मासिक प्रकाशित करीत राहिले. त्याकरिता स्वतः पायपीट केली. उच्च शिक्षणातील मराठीचे अभ्यासक्रम हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. त्यावर सखोल अभ्यास हे कर्तव्य मानून त्यांनी तळमळीने लिहिले.
‘तुमचे कसे काय चालले आहे?’ असे सरांनी विचारले की ‘तुम्ही काय लिहिताय?’ असे त्यांना विचारायचे आहे, हे नेमके कळायचे. पदनाम कोशातील क्लिष्ट शासकीय शब्दांना पर्यायी शब्द सुचवणारे सदर त्यांनी आनंदाने चालवले. सरांना काहींनी दुर्वास ऋषी असे संबोधले पण सर अतिशय ठामपणे, निग्रहीपणे आपल्या भूमिका मांडत राहिले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी कोकजे सरांसोबत दावतर सरांना भेटायचे. अतिशय मायेने सर चौकशी करायचे. त्यांचे विलक्षण चमक असलेले डोळे आणि गूढ स्मित माझ्या स्मरणात पक्के आहे. ‘आलोचनेचा अग्निनेत्र’ हे कोकजे सरांनी लिहिलेले त्यांचे व्यक्तिचित्र अतिशय बोलके आहे.
२०२५ हे वसंत दावतर यांचे जन्मशताब्दी वर्ष. मराठीत ‘आलोचना पर्व’ साकारणाऱ्या सरांना विनम्र आदरांजली!