Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Aurangzeb tomb : औरंगजेब कबरीच्या वादामुळे पर्यटन ठप्प!

Aurangzeb tomb : औरंगजेब कबरीच्या वादामुळे पर्यटन ठप्प!

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेब एक जुलमी बादशहा होता. त्याची कबर महाराष्ट्रात नको, अशी राजकीय मागणी होऊ लागली आहे. ही मागणी सुरू झाल्यापासून औरंगजेबाच्या खुलताबादमधील कबरी भोवती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या घडामोडींचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजिंठा आणि वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला तसेच मुघलकालीन वास्तू बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, असे स्थानिक सांगत आहेत. शाळा महाविद्यालयांच्या परीक्षांमुळेही पर्यटनात घट झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.



जगप्रसिद्ध वेरुळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर, खुलताबाद भद्रा मारूती तसेच सुफी संताचा दर्गा खुलताबाद परिसरात असल्याने या भागात कायम पर्यटकांचा राबता असतो. मात्र, मागील काही दिवसांत औरंगजेब कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचा परिणाम पर्यटनावर होत आहे. यामुळे परिसरातील हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. पर्यटकांनी आगाऊ केलेली नोंदणी रद्द करत येथे येण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे. विविध भागातील पर्यटक सध्या वातावरण कसे आहे ? अशी विचारणा करूनच पर्यटनाची आखणी करत आहेत. दरम्यान, वेरूळ, खुलताबाद परिसरात जवळपास १०० चांगल्या दर्जाच्या रिसोर्ट, हॉटेल, लॉजिंग आहेत. मात्र, औरंगजेब कबर प्रकरणामुळे गेल्या १५ दिवसापासून आगाऊ नोंदणी धडाधड रद्द होत असल्याने व्यावसायिक व्यथित झाले आहेत. शिर्डी, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर असे पर्यटनाचे मोठे सर्कीट असल्याने या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हॉटेलची ऑनलाईन बुकींग महिना पंधरा दिवस अगोदर होते. मात्र, मागील काही दिवसांपासून केवळ औरंगजेब कबर प्रकरणामुळे जो वाद व गदारोळ सुरू असल्याने बुकींग रद्द होत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत.

Comments
Add Comment