स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात क्रूरकर्मा औरंगजेब याचा पुतळा जाळल्यावरून पेटलेल्या दंगलीने सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले. नागपूरची गोड संत्री देशभर प्रसिद्ध आहेत. ऑरेंज सिटी असा नागपूरचा देशात लौकिक आहे. नागपूरचे लोक शांतता प्रिय व गोड स्वभावाचे आहेत. एक सुशिक्षित व सुसंस्कृत शहर म्हणून नागपूर ओळखले जाते. गेल्या दोन दशकांत नागपूर शहराचा योजनाबद्ध विकास झाला आणि नागपूर हे देशातील एक आदर्श व अाधुनिक महानगर व्हावे यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योजनाबद्ध प्रयत्न चालू आहेत. नागपुरातील प्रमुख रस्ते गुळगुळीत आणि चमकदार झाले आहेत. नागपुरातील मेट्रो आणि उड्डाणपुलांनी या शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. नागपूर करारानुसार उपराजधानीत दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन गेली सहा दशके घेतले जात आहे. रोजगार आणि शिक्षणासाठी या शहरात बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुघल सम्राट औरंगजेब याची छत्रपती संभाजी नगरजवळ (औरंगाबाद) खुलताबाद येथे असलेली कबर हटवावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन चालवले आहे. नागपुरात औरंग्याची प्रतिमा जाळल्यानंतर सोशल मीडियातून कुरणातील आयाती लिहिलेली चादर पेटवली अशी अफवा पसरवली गेली आणि मुस्लीम तरुणांना हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरायला जणू संधीच मिळाली.
नागपुरात रस्त्यावर उतरलेले दंगलखोर हे मुस्लीम होते, त्यात अनेक जण नागपूर बाहेरचे होते. त्यात बांगलादेशी आणि रोहिंग्योही होते असा संशय उघडपणे व्यक्त केला जातो आहे. दंगलखोरांनी दगडफेक, तोडफोड, जाळपोळ मोठ्या प्रमाणावर केली, दंगलखोरांचे टार्गेट जसे हिंदू समाजाची मालमत्ता होते तसेच गणवेषधारी पोलीस हेसुद्धा होते. पोलिसांवर दंगलखोरांनी तुफानी दगडफेक केली, पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. चार पोलीस उपायुक्तांसह पस्तीस पोलीस जखमी झाले. दंगलखोर एवढे हिंसक बनले होते की, त्यांनी उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. जमावावर पोलिसांनी लाठीमार केला व अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. पोलिसांवर हल्ले चढविणाऱ्या दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या कमरेवर लटकवलेले रिव्ह़ॉल्व्हर बाहेर का नाही काढले? दंगलखोर हे पोलिसांवर दगड व पेट्रोल बॉम्ब फेकत असताना आणि कुऱ्हाडीचे वार करीत असताना पोलीस त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत होते? महिला पोलिसांचे विनयभंग करण्याचे प्रयत्न दंगलखोरांनी केले, महिला पोलिसांच्या अंगावरील गणवेशावर हात टाकण्याचे प्रयत्न झाले, तरीही दंगलखोरांच्या दिशेने पोलिसांनी बंदुकीचे चाप ओढले नाहीत याचे मोठे आश्चर्य वाटते.
केंद्र सरकारच्या कठोर भूमिकेमुळे आता काश्मीर खोऱ्यात जरी बऱ्यापैकी शांतता दिसत असली तरी दोन दशके दहशतवादी व घुसखोरांच्या टोळ्यांचे हल्ल्याचे टार्गेट हे भारतीय सुरक्षा दले होती. सुरक्षा दलांची वाहने, जिप्स, बसेस, व्हॅन्स रस्त्यावर दिसल्या की, त्यावर दहशतवादी तुफानी दगडफेक करून पळून जात असत. अशा हल्ल्यात सुरक्षा दलाचे असंख्य जवान व अधिकारी जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांच्यावर आरोप करून त्यांची बदनामी करणे हा काश्मीर पॅटर्न आहे. नागपूरच्या दंगलीत दंगलखोरांनी हाच पॅटर्न राबवलेला दिसतो.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे नागपूरमध्ये पोलिसांनी बाराशेपेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेतले, शंभरावर दंगलखोरांना अटक केली. त्यातले अनेक जण नागपूर बाहरचे आहेत. ते दंगलीच्या दिवशी तेथे कशासाठी आले होते? दंगलखोरांत बांगलादेशी व रोहिंग्यो सामील होते, हा आरोप खरा असेल तर ते पोलिसांचे अपयश म्हटले पाहिजे. नागपुरात बांगलादेशी, रोहिंग्यो, घुसखोर कुठून आले, कसे आले, केव्हा आले? पोलिसांना काहीच ठाऊक नाही काय? मुंबईप्रमाणे नागपूरही आता घुसखोरांची धर्मशाळा बनली आहे का? देशाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे नागपुरात राहतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरकरच. गेल्या दहा वर्षांत साडेसात वर्षे राज्याचे गृह खाते त्यांच्याकडेच आहे. सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तर नागपूरचे पालकमंत्री आहेत. नागपूरचे खासदार, सर्व आमदार व सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे आहेत. संघ परिवारातील ३२ संस्थांची मातृसंस्था असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय याच शहरात आहे. पवित्र दीक्षाभूमीही याच शहरात आहे. येत्या गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला येत आहेत. पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रातील व राज्यातील अनेक मंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत. नागपूरमध्ये ९० टक्के हिंदू आहेत. मग या शहरात चार ते पाच तास अनियंत्रित व बेलगाम हिंसाचार कसा चालू राहतो? नागपुरात काही अघटित घडणार याची पुसटशी कल्पनाही पोलीस यंत्रणेला नव्हती का? विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची प्रतिमा पेटवल्यानंतर सोशल मीडियावर ज्या क्लिप व्हायरल झाल्या, त्यावरून पोलिसांना काहीच बोध घेता आला नाही का? कुराणाची आयात लिहिलेली चादर विहिंप व बजरंग दलाने जाळली या सोशल मीडियावरील प्रचारानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि संवेदनशील विभागात मोठी कुमक बोलवावी असे पोलिसांना वाटले नाही का? राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा केंद्रीय औद्योगिक पोलीस दल यांच्या तुकड्या त्यांना काही काम नाही म्हणून नागपुरात तैनात करण्यात आल्या आहेत काय?
देशात सर्वत्र छावा चित्रपट जोरात चालू आहे. छावा बघितल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांविषयी भक्ती, सन्मान, प्रेम प्रत्येकाच्या मनात उफाळून येतो. स्वत: पंतप्रधानांनी छावाचे कौतुक केले. राज्यातील आमदार, मंत्री यांच्यासाठी छावाचे खास आयोजन करण्यात आले होते. संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाविषयी छावा बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनात चीड, संताप प्रकट होणे स्वाभाविकच आहे. संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची महाराष्ट्रात कबर हवीच कशाला अशी भावना हिंदूंच्या मनात प्रबळ झाली, त्यातूनच औरंग्याची कबर हटवा, मोहीम सुरू झाली.
छावा चित्रपटाने संभाजी महाराजांविषयी भक्ती निर्माण झाली पण विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने संताप आणि चीडही निर्माण झाली. समाजवादी पक्षाचे अबू आजमी यांनी तर औरंगजेब क्रूर नव्हता असे वक्तव्य केल्याने हिंदू संतप्त झाले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर औरंगजेबाप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांचा कारभार आहे असे सांगून हिंदूंच्या भडकलेल्या भावनेत जणू तेल ओतण्याचे काम केले. उबाठा सेनेचे अनिल परब यांनी, तर आपला संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला असे सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला म्हणजे नेमके काय झाले असा प्रश्न विचारून त्यांच्या भाषणाची हवाच काढून घेतली. एक नोटीस येताच कोणी कसे लोटांगण घातले होते, याची एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला आठवण करून दिली.
नागपुरात औरंगजेबाची प्रतिमा जाळली पण त्यावर कुठे आयात लिहिलेली नव्हती असे स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मग ही अफवा कोणी पसरवली? एका चित्रपटावरून दंगल पेटली, असे यापूर्वी कधी झाले आहे काय? महिला पोलिसांचे विनयभंग व अश्लील शेरेबाजी झाल्यावरही पोलीस यंत्रणा शांत कशी बसू शकते? उत्तम दर्जाच्या फायबरच्या काठ्या, शॉक देणाऱ्या काठ्या, चिलखत, शिरस्त्राण आणि दंगलखोरांशी सामना करायला पुरेशी काडतुसे असा सुसज्ज शस्त्रसाठा पोलिसांकडे नव्हता का? यापूर्वी दिल्ली व मुंबईच्या दंगलीत पोलिसांवर दंगलखोरांनी हल्ले करून त्यांना भोसकून ठार मारल्याच्या घटना डोळ्यांसमोर असताना नागपूर पोलीस ढिम्म का राहिले? विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाविषयी तक्रार नोंदविण्यासाठी मायनॉरिटीज डेमॉक्रॅटीक पक्षाचा नागपूर शहराचा अध्यक्ष फहिम खान हा गणेश पेठ पोलीस ठाण्यावर जमाव घेऊन आला, तेव्हा जमावातील लोकांनी अलमगीर औरंगजेब जिंदाबाद, औरंग्या आमचा बाप आहे, अशा घोषणा दिल्या असतील, तर पोलिसांनी वेळीच सावध व्हायला नको होते का?
औरंगजेबाचे थडगे उखडून फेकून द्या, बुलढोझर फिरवा, अशी मागणी केली जाते आहे. कोण आहे औरंगजेब, त्याचा काय संबंध असा प्रश्न विचारला जातो आहे. औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. औरंगजेबचा मृत्यू १७०७ मध्ये अहिल्यानगर (तेव्हाचे अहमदनगर) येथे झाला. त्याचा मृतदेह खुलताबादला आणला. छत्रपती संभाजी नगरपासून २५ किमी अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे औरंगजेबची कबर आहे. मजार मुगल सम्राट शहेनशाह हजरत औरंगजेब आलमगीर, असा तिथे फलक आहे. ही कबर औरंगजेबाच्या मुलाने बांधली. हे संरक्षित स्मारक असून जो कोणी याची नासधूस करील किंवा हानी पोहोचवेल, त्याला भारतीय पुरातत्त्व अधिनियमान्वये ३ महिने कारावास किंवा ५ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतील असे तेथे फलकावर लिहिलेले आहे. या कबरीच्या बांधणीसाठी त्या काळात १४ रुपये १२ आणे खर्च आला होता. या कबरीचा देखभालीचा खर्च केंद्र सरकार करीत आहे. नागपूरमधील हिंसाचारानंतर कबरीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. केंद्र सरकारच्या संमतीनंतर आणि केंद्राची मदत घेऊनच महाराष्ट्रातील औरंगजेबाचे थडगे हटवावे लागेल. राज्यात व केंद्रात भाजपाचेच सरकार आहे. औरंगजेबाचा मुद्दा संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करीत नाही, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेली समतोल व संयमी भूमिका सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.