सनरायझर्स हैदराबाद म्हटले की आठवतो २०२४ चा हंगाम. या हंगामात सनरायझर्सने दोन वेळा आयपीएल मधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. अठराव्या हंगामात सनरायझर्स पुन्हा एकदा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली त्याच जोमाने मैदानात उतरला आहे. सनरायझर्सच्या ताफ्यात दोन नवीन चेहरे दाखल झाले आहेत, ते म्हणजे इशान किशन आणि मोहम्मद शमी. या दोघाच्या समावेशामुळे सनरायझर्सची ताकद अजून वाढली आहे. असा हा ताकदवान संघ आज राजस्थान राॅयलशी भिडणार आहे. रायझर्सकडे अभिषेक आणि हेड सारखे तडाखेबंध सलामीवीर आहेत, तर मधल्या फळीत इशान किशन, नितीश रेड्डी व हेनरिच क्लासेन सारखे संयमी फलंदाज आहेत. रायझर्सची गोलंदाजी ही तेवढीच भेदक आहे, त्यांच्याकडे पॅट कमिन्स, मोहम्मद शामी सारखे वेगवान गोलंदाज आहेत तर फिरकीची जबाबदारी ऍडम झंप्पा आणि राहुल चहर ह्यांच्यावर आहे.
सनरायझर्सशी दोन हात करायला येत आहे राजस्थान रॉयल्स. हा संघ आज रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, संजू सॅमसंग बोटाच्या दुखापतीमुळे आज यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही परंतु तो यशस्वी जयस्वाल सोबत सलामीला खेळणार की नाही ते पहावे लागेल. कदाचीत त्याचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी वापर करू शकतील. जर संजू सॅमसंग सलामीला नाही खेळला तर सलामीला कोण हा राजस्थानसाठी एक प्रश्न असेल. मधल्या फळीची जबाबदारी रियान पराग, शुभम दुबे व हेटमायर यांच्यावर राहील. फिनिशर म्हणून ध्रुव जुरेल आहेच. राजस्थानचा प्रयास हा राहील की जास्तीत जास्त फिरकी गोलंदाज खेळविणे कारण हेड व क्लासेन सारख्या फलंदाजाना काबूत ठेवायचे आहे जेणे करून एक मोठी धावसंख्या उभारली जाणार नाही. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे व आकाश मधवाल यांच्यावर राहील. राजस्थानची संयमी खेळी या सामन्याचा निर्णय त्यांच्या बाजूने वळवू शकते का ते पाहू.