Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखकरिअरची दिशा ठरवा

करिअरची दिशा ठरवा

रवींद्र तांबे

आपल्याला विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी असतात. त्यासाठी योग्य वेळी आपल्याला आपल्या करिअरची दिशा ठरवावी लागेल. एकदा संधी गेली की परत येत नाही. लोकप्रिय क्षेत्र आणि जास्त पगार कुठे मिळतो याच्या आपण शोधात असतो. सध्या ही परिस्थिती बदललेली आहे. तेव्हा आता जरी दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्याने मोकळा श्वास घेऊ नंतर बघू करिअरचे असे न करता परीक्षेचा निकाल लागण्याच्या पूर्वी आपल्याला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. नंतर आपण कोणती पदवी संपादन करणार आहोत. त्यानंतर रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत याचा विचार करून आपल्या करिअरची दिशा ठरवावी लागेल त्यासाठी थोडक्यात घेतलेला वेध.

जीवनात स्वत:चे करिअर घडविण्यासाठी त्याला योग्य दिशा द्यावी लागते. जर दिशा चुकली की काय होते याची सर्वांना कल्पना आहे. तेव्हा विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना आपल्या करिअरची दिशा ठरवावी लागेल. प्रत्येकाच्या जीवनात दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा अतिशय महत्त्वाची असते. तेव्हा प्रत्येकाचे करिअर या बोर्डाच्या परीक्षेवर अवलंबून असते. १५ मेच्या आत बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. यात कोणाला यश तर काहींना अपयश, काहीजण विशेष श्रेणीत पास तर काहींना अपेक्षेप्रमाणे खूपच कमी गुण त्यामुळे निकाल लागल्यानंतर नेमके काय करावे याच्या शोधात असतात. तेव्हा आपल्याकडे वेळ सुद्धा नसतो. यामुळे आपली इच्छा असून सुद्धा आवडीच्या अभ्यासक्रमापासून वंचित राहतो. याचा परिणाम आपल्या आवडीचे क्षेत्र नसल्यामुळे आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो, यामुळे आपण त्यामध्ये अयशस्वी होतो. नंतर आपण ओरडत बसतो की, आपल्या करिअरची दिशा चुकली. तेव्हा दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची वाट न पाहता विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवावी. म्हणजे निकाल लागल्यावर योग्य अभ्यासक्रमाला पसंती देता येईल.

आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्यामुळे विश्रांती न घेता आपल्या करिअरच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपले करिअर ठरवताना स्वत:ची आवड आणि आपल्याकडे असलेले कौशल्य याचा विचार करून करिअरची निवड करावी. त्या अानुषंगाने आपल्या विभागात किंवा जवळपास ज्या शिक्षण संस्था असतील त्यांना भेट देऊन त्या अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. हल्ली अनेक ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असते. त्यात सीईटी परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांचा ताण वाढत आहे. विरारमध्ये तर बारावीच्या काही प्रश्नपत्रिका जळल्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम निकालावर होणार आहे. असे असले तरी शेवटी सरासरी गुण दिले जातात याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. तेव्हा आपल्या करिअरची दिशा ठरविण्यासाठी आतापासून करिअरच्या शोधात असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी, आपले ध्येय काय आहे हे ओळखून नवनवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. त्यासाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन त्यांची मदत घ्यावी. यामध्ये व्यावसायिक शिक्षण संस्था, उद्योग मार्गदर्शन केंद्र, रोजगार मार्गदर्शन केंद्र आणि विद्यापीठ मार्गदर्शन केंद्र यांची मदत घेतली पाहिजे. त्यामुळे विविध अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधी यांची कल्पना येते. काही ठिकाणी निकाल लागल्यानंतर ‘करिअरची दिशा’ या शीर्षकाखाली चर्चासत्राचे आयोजन केले जाते. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येते. तेव्हा शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने जरून चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. मात्र ते बोर्डाच्या निकालापूर्वी करावे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उत्तेजन मिळते. तसेच करिअरची दिशा ठरविल्याने आपले ध्येय निश्चित होते. त्याप्रमाणे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. एक प्रकारे मनावरचा ताण कमी होण्याला मदत होते. यामुळे आपल्या कारकिर्दीला सुरुवात होऊन आपले लक्ष आपल्या ध्येयावरती केंद्रित करता येते. तसेच पुढे निर्माण होणाऱ्या अडचणींवर सहज मात करता येते. यामुळे आपल्याला खरी प्रेरणा मिळून आपला आत्मविश्वास वाढण्याला मदत होते. याचा परिणाम आपल्याला कठोर परिश्रम घेण्याची जिद्द निर्माण होते. त्याचप्रमाणे आपल्याला निर्णय घेणे सुद्धा सोपे जाते. आपल्या पसंतीप्रमाणे ध्येय साध्य करायचे असल्याने आपली जबाबदारी सुद्धा वाढते. त्यामुळे अधिक उत्साहाने काम करण्यास सक्रिय होतो. त्याआधी आपल्या आवडीच्या ध्येयावर चिंतन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले ध्येय साध्य करणे अधिक सुलभ होऊन आपली प्रगती करता येते. यात काही वेळा बदल करणे गरजेचे असते. त्यानुसार बदल करायला शिका. नक्कीच त्यातून नवीन चांगला बदल झालेला दिसून येईल. यासाठी महत्त्वाकांक्षा अधिक महत्त्वाची असते. त्यासाठी आपल्या मनावर ठाम राहायला हवे. त्यासाठी ध्येयाच्या चांगल्या-वाईट परिणामाचा अभ्यास करायला हवा. तेव्हा काही परिस्थिती गृहीत धरून ध्येय स्वीकारता आले पाहिजे किंवा ध्येय जुळवून घेता आली पाहिजेत. त्यात आपलाच विजय असतो हे मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे. तेव्हा ध्येय निश्चित करण्यापूर्वी विचार करून निर्णय घ्यावा. शेवटी आपल्या करिअरचा प्रश्न असतो. पुढे निर्माण होणाऱ्या प्रश्नांना हसत हसत सामोरे जाण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. तरच आपले करिअर आपण घडवू शकतो. राज्यात आज कंत्राटी हंगामी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे पालकमंत्र्यांना साकडे घालण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपले पुढील ध्येय ठरविताना विद्यार्थ्यांनी आपली आवड-निवड आणि भविष्याचा विचार करून आपल्या करिअरची दिशा ठरवावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -