एससी कॉलेजियमने केली बदलीची शिफारस
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख पैसे मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने या न्यायमूर्तींना अलाहाबादच्या हायकोर्टात बदली करण्याची शिफारस केली आहे. यशवंत वर्मा असे या न्यायमूर्तींचे नाव असून त्यांच्या सरकारी निवासस्थानाला आग लागली होती, ही आग विझवायला गेलेल्या अग्निशमन दलाला त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पैशांचा साठा सापडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली तेव्हा वर्मा हे दिल्लीत नव्हते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला बोलविले. ही आग विझवत असताना एका खोलीत अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कॅश सापडली. पोलिसांनी याची माहिती ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना दिली. तिथून सर्वोच्च न्यायालयाला याची सूचना देण्यात आली. हायकोर्टाच्या जजच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेत खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही न्यायमूर्तींनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
IPL 2025 : IPLआधीच BCCIचा मोठा निर्णय! चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठणार
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्धचा अहवाल आल्यानंतर वर्मा यांची बदलीची शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गुरुवारी (दि. २०) तातडीची बैठक घेतली आणि त्यामध्ये बदलीची शिफारस करण्यात आली. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. काही जज न्यायपालिकेची छवी चांगली ठेवण्यासाठी वर्मा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहे. जर वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सर्वोच्च न्यायालयाने १९९९ च्या प्रक्रियेनुसार तपास सुरु करावा, अशी मागणीही केली आहे. तसेच नुसती बदली केली तर न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास उडेल असेही त्यांचे म्हणणे आहे.