झळा या लागल्या जीवा…

Share

प्रासंगिक : स्वाती पेशवे

होळी जळली, थंडी पळाली असे आपण म्हणत आलो आहोत. पण प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांमध्ये तसेच यंदाही होळीआधीच सरासरी तापमान वाढत गेल्याने पुढील हंगाम अतिउष्ण राहणार असल्याचे संकेत मिळतात. एकंदरच यंदाचा उन्हाळा भाजून टाकणारा असेल, यात शंका नाही. मात्र त्यासाठी कोणते पर्यावरणीय घटक कारणीभूत आहेत, याची माहिती घेणेही गरजेचे ठरते.
ऋतूबदल ही नित्याची नैसर्गिक घटना असली तरी अलीकडे येणारे ऋतू कोणते आक्रित घडवेल, या विचाराने धास्ती वाढण्याजोगी परिस्थिती बघायला मिळते. प्रत्येक ऋतूमध्ये येणारे संकट अधिकाधिक गहिरे होत असल्यामुळे पावसाळ्यात प्रचंड पावसामुळे होणाऱ्या हानीची, हाडे गोठवणाऱ्या थंडीमुळे सोसाव्या लागणाऱ्या त्रासाची आणि प्रचंड उन्हामुळे होरपळून जाण्याची चिंता हा ऋतूबदलाच्या काळातील एक अनिवार्य भाग ठरतो आहे. तापणाऱ्या उन्हाने यंदाचा उन्हाळा सामान्य नसल्याची जणू सूचनाच दिली आहे. मार्च अखेरपर्यंतच अनेक भागांमध्ये उन्हे तापू लागली असून तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढचे जवळपास तीन महिने आपली किती होरपळ होईल, हे सांगता येणार नाही. पाणवठे कोरडे पडणे, जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न, उष्माघातामुळे होणारे मृत्यू, भाजीपाल्याचा अभाव आणि कडाडणाऱ्या किमती हे आणि यासारखे नानाविध विषय वाढत्या उष्म्याशी संलग्न असल्यामुळे ही दाहकता एकांगी राहत नाही. त्याची धग वा चटके सर्वांगाने आणि सर्वार्थाने जाणवतात. म्हणूनच या वाढत्या दाहामागील कारणांची दखल घेणे गरजेचे ठरते.
यंदाचा उन्हाळा अत्याधिक तीव्रतेमुळे आतापासूनच चर्चेत आहे. तापमान लक्षणीयरित्या वाढत असल्यामुळे लोकांना असह्य उष्णतेचा अनुभव मिळू लागला आहे. तापमानाची पातळी अल्पावधीतच उच्चतम स्तरावर पोहोचण्याची शंका तज्ज्ञांकडून व्यक्त होत असल्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेचा प्रचंड कहर बघायला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. अशा या तापमानवाढीला अनेक घटक कारणीभूत आहेत. सध्या जगभर चर्चेत असणारे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ हे त्यामागील एक प्रमुख कारण म्हणावे लागेल. सध्या नानाविध कारणांमुळे पृथ्वीवरील सरासरी तापमानवाढ अनुभवाला येत आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान आहे ते मानवी हस्तक्षेप आणि त्याच्या व्यवहाराचे. आताच्या तंत्र आणि यंत्रयुक्त जगात मानवाकडून होणारे प्रदूषण तसेच कार्बन डायऑयसाईडचे उत्सर्जन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यामुळे हवामानात बदल होऊन सामान्यत: गारठा असणाऱ्या काही भागांमध्येदेखील उष्णता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळेच आता भर उन्हाळ्यात थंड हवेसाठी ओळखली जाणारी ठिकाणे तापताना दिसतात.
कार्बन डायऑक्साईड हा सर्वात मोठा ग्रीनहाऊस गॅस आहे. याच्या वाढत्या प्रमाणामुळे उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर कायम साठून राहते आणि प्रखर सूर्यप्रकाशाची साथ मिळताच उष्णतेची तीव्रता वाढते. परिणामस्वरूप एकविसाव्या शतकात सुमारे १.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची वाढ झाली आहे. या वाढीमुळे पाण्याचे वेगाने बाष्पीभवन, पाण्याचे प्रमाण कमी होणे हे परिणाम दिसत असून देशभरात तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे. वनीकरणाची कमतरता हादेखील या समस्येशी संबंधित एक महत्त्वाचा घटक आहे. कारण वनस्पती पृथ्वीवर एक प्रकारे कूलिंग एजंट म्हणून काम करतात. झाडे आणि वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ओलावा निर्माण करतात. यामुळे तापमान नियंत्रित राहते. तथापि, मानवी हस्तक्षेपामुळे जंगलांची तोड सुरू आहे. विशेषत: भारतात वृक्षतोड अधिक तर वनीकरणाचे प्रमाण गरजेपेक्षा अत्यंत कमी आहे. तापमानात वाढ होण्यामागे हेदेखील एक महत्त्वपूर्ण कारण आहे. पाणी संकलनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे यंदा वातावरण अधिक उष्ण होताना दिसते आहे. ही निश्चितच धोक्याची घंटा म्हणायला हवी.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरीकरणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच शहरी क्षेत्रात इमारती, रस्ते आणि कारखान्यांच्या कचऱ्यामुळेही अधिक उष्णता निर्माण होते. शहरी भागांमध्ये ‘हीट आयलंड’चा प्रभाव अधिक दिसतो. म्हणजेच शहरी भागातील तापमान ग्रामीण भागांच्या तुलनेत वाढलेले दिसते. काँक्रीट, स्टील आणि इतर बांधकाम साहित्य सूर्यप्रकाश शोषून अधिक उष्णता सोडते. त्याचप्रमाणे यांत्रिक उपकरणे आणि वाहनांच्या उत्सर्जनातून तयार होणारी उष्णताही प्रभाव दाखवते. यामुळेच शहरांमध्ये अधिक उष्णता साठवली जाते आणि या साठलेल्या उष्णतेमुळे आसपासचा परिसर जास्त तापतो. दुसरीकडे, पाण्याच्या साठवणुकीच्या समस्याही वाढत आहेत. अलीकडे पावसाच्या प्रमाणात आपण सगळेच बदल अनुभवत आहोत. हवामानातील बदलामुळे पाऊस कमी होत आहे. पाऊस झाला तरी अचानक आणि प्रचंड प्रमाणात होतो. यालाच आपण अवकाळी म्हणतो. परिणामी, पाण्याच्या साठवणुकीचे आणि व्यवस्थापनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. जलाशय, नदी आणि जलसाठ्यांमध्ये पाणी कमी होते आणि उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवतात. कमी पाण्यामुळे वाढलेली उष्णता अधिक कष्टदायक बनते. वाढत्या उष्णतेमागे वायू प्रदूषण आणि ग्रीन हाऊस गॅसची कारणे ही आधुनिक काळाची देणगीच म्हणावी लागेल. सध्या उद्योग आणि वाहतूक क्षेत्रामुळे वायू प्रदूषण अधिक होते आहे. यामुळे वातावरणातील ग्रीनहाऊस वायूंचे प्रमाणही वाढते. विशेषत: कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडसारख्या वायूंचे प्रचंड उत्सर्जन होते आहे. यामुळेही उष्णता साठून राहण्यास मदत होते आणि पृथ्वीवरील तापमान वाढते. याचा थेट परिणाम उष्णतेच्या वाढत्या प्रकोपाच्या रूपाने आपल्याला अनुभवायला मिळतो. हे सर्व लक्षात घेता वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच जलवायू बदलावर कारवाई करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय करार झाले आहेत. ‘पॅरिस करार’ हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. या कराराचा उद्देश जलवायू बदलावर नियंत्रण ठेवणे हा आहे. त्यात सहभागी देशांनी २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करणार असल्याचे वचन दिले आहे. तथापि, त्याच्या अंमलबजावणीपुढेही अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. त्यामुळेच जलवायू बदलावर नियंत्रण ठेवणे हा सध्या जटिल प्रश्न होऊन बसला आहे.
या सगळ्यांचा परामर्श घेता यंदाच्या तलखीसाठी आपण तयार राहायला हवे. कारण जटिल प्रश्नांचा हा गुंता इतक्यात सुटण्याची अपेक्षा धरणे मूर्खपणाचे ठरेल. मानवी सहनशक्तीच्या पलीकडे उष्णता वाढल्यास आरोग्य आणि जीवनशैलीवर मोठे परिणाम होतात. आत्ताच स्ट्रोक, हृदयरोग आणि रक्तदाब यांसारख्या समस्या वाढत आहेत. विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि विकलांग व्यक्तींना याचा अधिक त्रास होताना दिसत आहे. असह्य उष्णतेमुळे कृषी क्षेत्रावरही परिणाम होतो. पिकांना कमी पाणी मिळाल्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. परिणामी, महागाई भरमसाट वाढते आणि अर्थसंकट गडद होते. अशा सर्व विपरित परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आत्तापासून करायला हवी. अलीकडेच ताज्या संशोधनात सिद्ध झाले आहे की, येत्या काळात जलवायू बदलामुळे वादळे आणि टायफूनसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. या प्रकारच्या वादळांमध्ये जास्त तीव्रता आणि वारंवारता दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, २०२५ च्या वसंत ऋतूमध्ये एकीकडे उष्णतेचा प्रकोप दिसेल तर काही ठिकाणी प्रचंड चक्रीवादळे आणि बर्फवृष्टीही होईल, असा संशोधकांचा अंदाज आहे. म्हणजेच येत्या काळात हवामानातील अस्थिरता वाढणार आहे. या प्रकारच्या वादळांमुळे सर्वदूर अत्यधिक उष्णतेचा प्रभाव जाणवू शकतो.
हे सगळे असले तरी उष्णतेच्या लाटेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर’ आदी योजनांचा वापर महत्त्वाचा ठरू शकतो. यामध्ये रस्त्यांवर अधिक हिरवळ उभी करणे, वृक्षारोपण करणे तसेच इमारतींमध्ये ‘ग्रीन रूफ्स’सारख्या उपायांचा समावेश आहे. यामुळे शहरी भागांमध्ये तापमान कमी होऊ शकेल. खेरीज हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या  ‘सौर ऊर्जा’ आणि ‘पाणी संकलन पद्धती’  आदी नवतंत्रज्ञानाचा वापर करुनही वाढत्या उष्णतेच्या समस्येवर उपाय शोधला जाऊ शकतो. एका ताज्या संशोधनातून सौर क्रिया,  सौर वारा आणि चंद्राची गतीदेखील पृथ्वीवरील तापमानावर प्रभाव टाकत असल्याचे दिसून आले आहे. सौर क्रिया आणि चंद्राच्या आकर्षणामुळे पृथ्वीवरील तापमानवाढीच्या प्रमाणात बदल होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळेही या काळात तापमानबदलाचा वेग वेगळे परिणाम दाखवूू शकतो. थोडक्यात, सध्याची वाढती उष्णता केवळ प्रदूषण आणि उद्योगांशीच संबंधित नाही तर त्यामागील अनेक बारीक-सारीक घटकांचाही विचार करणे गरजेचे आहे. ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी नानाविध उपाय आणि जागतिक सहकार्य आवश्यक आहे. ते मिळाले आणि माणसाने जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून आणले तरच कदाचित या झळांपासून आपले रक्षण होऊ शकेल. अन्यथा, होरपळ अटळ आहे.
(अद्वैत फीचर्स)

Recent Posts

Best Bus : ‘बेस्ट’ बस का पडतेय आजारी ?

मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत…

10 minutes ago

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…

55 minutes ago

Electric Vehicles : महाराष्ट्र दिनापासून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

मुंबई  : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…

1 hour ago

वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…

1 hour ago

Mumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…

1 hour ago

MP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…

1 hour ago