जळगाव: मातृत्वाच्या आनंदाच्या क्षणीच दुःखाचा आघात झाल्याची हृदयस्पर्शी घटना पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात घडली. तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मातृत्वाचा आनंद मिळालेल्या ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (३७) यांचे प्रसूतीनंतर अवघ्या तीन तासांत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जुळ्या बाळांचा जन्म कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरला असताना, त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
ज्योती चौधरी यांनी सावनेकर हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलगा आणि मुलीला जन्म दिला. या घटनेने संपूर्ण कुटुंब आनंदात होते, मात्र अवघ्या तीन तासांतच, त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
१६ वर्षांच्या वाट पाहणाऱ्या पती, आई-वडील आणि कुटुंबीयांचा आनंद एका क्षणात दुःखात परिवर्तित झाला. चौधरी कुटुंबीयांनी या बाळांसाठी आणि ज्योती चौधरी यांच्या मातृत्वासाठी अनेक नवस केले होते. परंतु नियतीने वेगळेच चित्र दाखवले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण बाहेरपुरा भागावर शोककळा पसरली आहे.