Saturday, October 25, 2025
Happy Diwali

महायुतीच्या पाच उमेदवारांचा विधान परिषदेत बिनविरोध विजय, दोन्ही सभागृहात महायुतीचे वर्चस्व

महायुतीच्या पाच उमेदवारांचा विधान परिषदेत बिनविरोध विजय, दोन्ही सभागृहात महायुतीचे वर्चस्व
मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या पाच उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. या उमेदवारांनी विधान परिषदेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यामुळे विधान परिषदेतील सदस्यांची संख्या आता ५७ झाली आहे. विधान परिषद (ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरचे सभागृह) आणि विधानसभा (कनिष्ठांचे सभागृह किंवा खालचे सभागृह) या दोन्ही ठिकाणी महायुतीचे निर्विवाद वर्चस्व आहे.
रिक्त झालेल्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे तसेच शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके हे पाच जण बिनविरोध विजयी झाले. बिनविरोध विजयी झालेल्या या पाच उमेदवारांनी विधान परिषदेत सदस्यत्वाची शपथ घेतली. आता विधान परिषदेत भाजपाचे २२, शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि ३ अपक्ष आमदार असे महायुतीचे एकूण ४० सदस्य आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिउबाठाचे ७, काँग्रेसचे ७, शरद पवारांच्या राशपचे ३ असे मविआचे एकूण १७ सदस्य आहेत. विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत.
विधानसभेत भाजपाचे १३२, शिवसेनेचे ५७, राष्ट्रवादीचे ४१, जनसुराज्याचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, राजर्षी शाहू विकास आघाडीचा १, अपक्ष २ असे महायुतीचे एकूण २३७ सदस्य आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिउबाठाचे २०, काँग्रेसचे १६, शरद पवारांच्या राशपचे १०, समाजवादी पक्षाचे २, एमआयएमचा १, मार्क्सवादी कम्युनिस्टांचा १, शेकापचा १ असे मविआचे एकूण ५१ आमदार आहेत.
राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
Comments
Add Comment