मुंबई : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे. कँडेला कंपनीची ई-वॉटर टॅक्सी सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकीदरम्यान दिली आहे.
महायुतीच्या पाच उमेदवारांचा विधान परिषदेत बिनविरोध विजय, दोन्ही सभागृहात महायुतीचे वर्चस्व
मंत्रालयात मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याशी स्वीडनचे महावाणिज्य दूत ओस्टबर्ग यांनी ई-वॉटर टॅक्सीबाबत चर्चा केली. यावेळी ओस्टबर्ग यांच्या सल्लागार सलोनी झव्हेरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री नितेश राणे म्हणाले की, मुंबई महानगरामध्ये वाहतूक यंत्रणेवर ताण येत असून ई-वॉटर टॅक्सी लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. स्वीडनच्या कँडेला कंपनीशी झालेल्या करारानुसार त्यांनी नागरिकांची सुरक्षितता, वातावरण, पर्यावरण यांचा विचार करावा. शिवाय वॉटर टॅक्सीचे नागरिकांना परवडणारे माफक दर ठेवावेत. कंपनीला लागणाऱ्या परवान्याबाबत राज्य शासन दक्षता घेईल.
पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबईतील मॉल बंद करण्याचा आदेश
ओस्टबर्ग यांनी महाराष्ट्रातील बंदर विकासात स्वारस्य दाखवले. वॉटर टॅक्सी सेवेबाबत कँडेला कंपनीचे प्रतिनिधी लवकरच राज्य शासनाला सविस्तर माहिती देणारे सादरीकरण करतील, असे ओस्टबर्ग म्हणाले. लवकरच वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महावाणिज्यदूत ओस्टबर्ग यांनी बंदर विकासाच्या कामात स्वीडीश कंपनी योगदान देऊ इच्छिते असे मंत्री नितेश राणे यांना सांगितले. यानंतर ससून डॉकची पाहणी करुन बंदर विकासाचा आराखडा सादर करा, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.