मुंबई (प्रतिनिधी): ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुलकर्णी सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्त्वाचे पात्र साकारत आहेत. या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान नीना यांची प्रकृती बिघडली. मात्र तरीही त्यांनी नाटकाचा प्रयोग केला, अशी माहिती नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी दिली आहे.
मराठी कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक सांस्कृतिक बंध आहे. पुढील प्रयोग रद्द केल्यानंतर नीनाताईंच्या प्रकृतीची चौकशी करणारे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे अनेक मेसेजेस प्रेक्षकांनी पाठवले. प्रेक्षकांचे हे अनन्यसाधारण प्रेम बघून भरून येते, असं लेखक संदेश कुलकर्णी म्हणाले आहेत. शिवाजी मंदिरात ८ मार्च रोजी ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता. महिलादिन असल्याने नाट्यगृह महिलांनी खचाखच भरले होते. पण या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना अशक्तपणा जाणवत होता, प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचा की नाही, या विचारात सगळे होते. मात्र त्यांनी ठामपणे ‘खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही’, अशी भूमिका घेतली. नीना कुलकर्णी यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांच्या मुलीने संदेश कुलकर्णी यांना फोन करून दिली होती. थकव्यामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं. तरीही त्यांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतराचा पडदा पडल्यावर नीनाताई रंगमंचावरच कोसळल्या. पुढचा प्रयोग करायचा नाही असे सर्वजण म्हणत होते, पण नीना कुलकर्णी यांनी प्रयोग पूर्ण केला. ‘काहीही झाले, तरी मी प्रयोग पूर्ण करेनच’, असा निश्चय केला आणि प्रयोग पूर्ण झाला. नीना कुलकर्णी यांची प्रकृती आता बरी आहे आणि नाटकाचे पुढचे प्रयोग सुरू झाले आहेत, अशी माहिती संदेश कुलकर्णींनी दिली.