मुंबई : रणबीर कपूरचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट ‘रॉकस्टार’चा सीक्वल येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.रणबीरने ‘रॉकस्टार’ सिनेमात साकारलेली जॉर्डनची भूमिका अजरामर ठरली. ‘रॉकस्टार’ सिनेमाची गाणी आणि ए.आर. रहमान यांनी दिलेल्या संगीताची चांगलीच चर्चा झाली. अशातच आता या सिनेमाचा सीक्वल येणार या चर्चेवर ‘रॉकस्टार’चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी खुलासा केलाय.
‘रॉकस्टार’चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत ‘रॉकस्टार’च्या सीक्वलविषयी मौन सोडलं. इम्तियाज म्हणाले की, “मी रॉकस्टारचा सीक्वल भविष्यात कधीच बनवणार नाही, असं म्हणणं उचित नाही. एखादी कल्पना डोक्यात आली आणि ती ‘रॉकस्टार २’साठी चांगली असेल तर सीक्वल बनवायला काय हरकत आहे. रॉकस्टारच्या सीक्वलसंदर्भात माझ्या डोक्यात एखादी अद्भूत कल्पना आली तर नक्कीच मी सीक्वलचा विचार करेन.”
२०११ साली ‘रॉकस्टार’ सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमात रणबीर कपूरने प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय अभिनेत्री नर्गीस फाखरीने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या दोघांशिवाय सिनेमात पियुष मिश्रा, कुमुद मिश्रा, जयदीप अहलावत या कलाकारांची भूमिका होती. रणबीरचे आजोबा आणि दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा ‘रॉकस्टार’ हा शेवटचा सिनेमा होता. शम्मी यांनी शहनाई वादकाच्या छोट्याश्या भूमिकेत चांगलीच छाप पाडली.