Friday, May 9, 2025

क्रीडा

आयपीएल स्पर्धेत एका सामन्यात वापरणार तीन चेंडू

आयपीएल स्पर्धेत एका सामन्यात वापरणार तीन चेंडू
मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रिमिअर लीग २०२५ हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सामन्यातील चेंडू वापराबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू होण्यास २ दिवस शिल्लक असताना मुंबईमध्ये आयपीएल संघांच्या कर्णधारांसोबत बीसीसीआयने बैठक घेतली. या बैठकीत गोलंदाजांना फायदेशीर ठरणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर एका सामन्यात तीन चेंडूंचा वापर करण्यात येणार आहे.



आयपीएल मधील सामन्यात आता एकूण ३ नव्या चेंडूंचा वापर होणार आहे. या आधी सामन्यातील २ डावांसाठी २ नवे चेंडू मिळायचे. पण आता धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला २ चेंडूसह खेळावे लागणार आहे. नव्या नियमानुसार दुसऱ्या डावासाठी २ चेंडू देण्यात येणार आहे, ज्यापैकी दुसरा चेंडू ११ व्या षटकांनतर चेंडू वापरण्यात येईल. हा नियम रात्रीच्या सामन्यांमध्ये दवामुळे होणारा परिणाम टाळण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे दव घटकामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाला होणारा फायदा आता मिळणार नाही.

चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठली

चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे चेंडू चमकवण्यासाठी आता गोलंदाजांना आता लाळेची मदत घेता येणार आहे. मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत नियम हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर बीसीसीआयकडून यावर सकारात्मक विचार करण्यात आला व आगामी आयपीएल हंगामात आता हा नियम हटवण्यात आला आहे. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यानंतर शमी म्हणाला होता की, ‘आम्ही नेहमीच अधिकाऱ्यांना लाळेचा वापर करण्यासाठी परवानगीची विनंती करत असतो. जेणेकरून सामन्यांदरम्यान स्विंग आणि रिव्हर्सचा वापर करता येईल. शमीच्या या विनंतीचे व्हर्नान फिलँडर आणि टिम साउथी सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही समर्थन केले होते. कोविड-१९ साथीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्याच्या जुन्या पद्धतीवर बंदी घातली होती. २०२२ मध्ये, आयसीसीने ही बंदी कायम ठेवली. आयसीसीप्रमाणे बीसीसीआयने देखील आयपीएलमध्येही हा नियम लागू केला होता. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार आहे.
Comments
Add Comment