तेलंगणा : बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराचे अॅप्स यांच्याशी संबंधित प्रकरणात राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह २५ सेलिब्रिटींवर तेलंगणा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. उद्योजक फणिंद्र शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह २५ अभिनेत्यांचा समावेश आहे. बेटिंग अॅप्सचा प्रचार करण्याचा आरोप या अभिनेत्यांवर ठेवण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की १६ मार्च रोजी काही युवकांशी चर्चा करताना लक्षात आले की सोशल मीडियावर प्रमोट केल्या जाणाऱ्या बेटिंग अॅप्सवर पैसे लावण्यास प्रोत्साहीत झाले होते. या अॅप्सना प्रमोट करण्यासाठी या सेलेब्रिटींकडून भरघोस पैसे घेतले जात असल्याचा आरोपही फणिंद्र शर्मा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.