गिरीराज सिंह : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री
दशकभरापूर्वी भारताची लोकसंख्या सुमारे १२५ कोटी होती आणि ग्राहकांचा खर्च हा प्रामुख्याने इच्छाशक्तीपेक्षा गरजेशी निगडित होता. खरेदीच्या सवयी ठरावीक होत्या. सणांसाठी नवीन कपडे, खर्चाचे काळजीपूर्वक नियोजन आणि खर्चापेक्षा बचतीवर अधिक लक्ष.लक्झरी ब्रँड्सची दुरूनच प्रशंसा केली जात होती आणि उच्च दर्जाची फॅशन केवळ उच्चभ्रू लोकांपुरती मर्यादित होती. परंतु आज १४२ कोटी लोकसंख्या आणि भरभराटीला आलेल्या मध्यमवर्गासह, तेच कुटुंब आत्मविश्वासाने प्रीमियम स्टोअर्समध्ये प्रवेश करते, ऑनलाइन खरेदी करते आणि जीवनातील टप्पे भव्यतेने साजरे करते. भारत आता फक्त वाढत नाही, तर तो भरभराटीला येत आहे. या बदलाला तीन प्रमुख आधारस्तंभांनी चालना दिली आहे. वाढती खरेदी शक्ती, ग्राहकांची विकसित होत असलेली मानसिकता आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतची डिजिटल पोहोच. वाढत्या उत्पन्नामुळे, सरकार-समर्थित उत्पादन उपक्रमांमुळे तसेच डिजिटलदृष्ट्या सक्षम भारतामुळे आर्थिक परिवर्तन उल्लेखनीय झाले आहे.
२०२० मध्ये सुरू झालेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजनने स्वयंपूर्णतेचा पाया घातला, जो उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय) आणि पीएम मित्र टेक्स्टाइल पार्क्समुळे आणखी मजबूत झाला. उत्पादनात भर पडताच रोजगार निर्मिती झाली आणि त्यासोबतच डिस्पोजेबल उत्पन्नात वाढ होऊन भारतीयांच्या खर्चाला नवा आकार प्राप्त झाला. उपभोग हा आता भारताच्या विकासगाथेचा कणा आहे, जो कापड क्षेत्राला सुवर्णयुगात नेण्यासाठी सज्ज आहे.
सक्षम भारत – आत्मविश्वासू, धाडसी आणि आकांक्षापूर्ण
वर्षानुवर्षे आकांक्षा आणि वास्तव यांच्यात मोठे अंतर राहिले. लोकांनी कठोर परिश्रम केले, मोठी स्वप्ने पाहिली, तरीही संधी त्यांच्या आवाक्यात येऊ शकल्या नाहीत. त्यानंतर धोरणात्मक बदलाच्या दशकात महत्त्वाकांक्षेचे यशामध्ये रूपांतर झाले. पायाभूत सुविधांचा विस्तार झाला, डिजिटल इंडिया आकाराला आला आणि आर्थिक सुधारणा मूर्त विकासाच्या चालक बनल्या. परिणाम? गुणवत्ता, शैली आणि सुविधा स्वीकारण्यास तयार असलेल्या आत्मविश्वासू ग्राहकांचा देश. उत्पन्नात वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये असणारे ७२,८०५ रुपये दरडोई उत्पन्न २०२३-२४ मध्ये १.८८ लाख रुपयांवर पोहोचले आहे आणि २०३० पर्यंत ते ३.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आज सहा कोटी भारतीय दरवर्षी ८.३ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात-२०१५ च्या तुलनेत दुप्पट. ही वाढती समृद्धी फॅशन, कापड आणि जीवनशैली उत्पादनांची मागणी अभूतपूर्वरीत्या वाढवत आहेत. २०२७ पर्यंत भारत ही चौथ्या क्रमांकाची ग्राहकोपयोगी बाजारपेठ असेल, जी केवळ परवडणाऱ्या दरांनी नव्हे तर आकांक्षांनी प्रेरित असेल. कोविडनंतरच्या काळात ग्राहकांच्या वर्तनात झालेला बदल हा पारडे फिरवून टाकणारा ठरला आहे. डिजिटल पोहोच वाढली, ऑनलाइन किरकोळ व्यवहार वाढले आणि युपीआय व्यवहार गगनाला भिडले-आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये २२० कोटींवरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आश्चर्यकारकपणे १८,५९२ कोटी झाले. या डिजिटल परिवर्तनामुळे शहरी-ग्रामीण भागातील दरी कमी होऊन महानगर असो वा लहान शहर, भारतीयांना आता जागतिक आणि स्थानिक फॅशन कल सहज उपलब्ध झाले आहेत.
भारताची फॅशन क्रांती – जिथे होतो परंपरेचा महत्त्वाकांक्षेशी मिलाप
एकेकाळी पाश्चात्त्य संकल्पना असलेली जलद फॅशन आता तरुण भारतीयांसाठी एक जीवनशैली बनली आहे. झुडिओ, रिलायन्स ट्रेंड्स आणि शीन यासारख्या ब्रँड्समुळे जे एकेकाळी वैशिष्ट्यपूर्ण होते ते आता सहज आवाक्यात आले आहे, १० अब्ज डॉलर्सच्या उद्योगाला २०३० पर्यंत ५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्यासाठी चालना देत आहे. परंतु हा बदल केवळ परवडणाऱ्या दरांबद्दल नाही-जलद फॅशनसोबत लक्झरी आणि हेरिटेज टेक्स्टाइलही भरभराटीला येत आहे. २०२७ पर्यंत महत्त्वाकांक्षी कुटुंबांची संख्या १०० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा ओलांडत असताना, हस्तनिर्मित कापड, रेशमी साड्या आणि उच्च दर्जाच्या डिझायनर कपड्यांना पुन्हा झळाळी प्राप्त होत आहे. ही क्रांती म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर ती सरकार-चलित उपक्रमांचा थेट परिणाम आहे. मध्यस्थांना मागे सारून, कारागीर मंचाचे अंकीकरण करून आणि ग्राहक-कारागीर थेट संपर्क सक्षम करून, डिजिटल इंडियाने फॅशनच्या खरेदी-विक्रीची परिमाणे बदलून टाकली आहेत. महाराष्ट्रातील पैठणी, काश्मीरमधील पश्मीना-आता एका क्लिकवर उपलब्ध आहेत. फॅशनचे हे लोकशाहीकरण कारागिरांना सक्षम बनवत आहे, हस्तकला वारसा पुनरुज्जीवित करत आहे तसेच भारताच्या वस्त्रवारशाला जागतिक पटलावर अग्रस्थान मिळवून देत आहे.
उच्च जीवनशैली आणि वारसा-आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ
भारतीय विवाहसोहळे नेहमीच भव्य राहिले आहेत, परंतु आज ते बहु-अब्ज डॉलर्सची आर्थिक शक्ती आहेत. ४५ अब्ज डॉलर्सचा विवाह उद्योग पारंपरिक विणकर समूहांमध्ये नवीन प्राण फुंकत आहे, कुटुंबे आता मोठ्या प्रमाणावरील उत्पादनापेक्षा कलात्मकतेला प्राधान्य देत आहेत. लक्झरी आता लेबलांबद्दल नाही, ती वारशाबद्दल आहे. वधू आणि वर भारताचा समृद्ध वस्त्रवारसा साजरा करणारे वैशिष्ट्यपूर्ण पर्याय निवडत आहेत- हाती विणलेले बनारसी रेशीम, लक्षवेधी कांजीवरम आणि मागणीनुसार डिझाइन. परंतु परिवर्तन केवळ पोशाखापुरते मर्यादित नाही. भारताची अर्थव्यवस्था जसजशी वाढत आहे तसतशी त्याची अभिजाततेची भूक देखील वाढत आहे. आर्थिक वर्ष १९-२३ दरम्यान स्थावर मालमत्तेच्या किंमती ३०% वाढल्या आणि मोठ्या, अधिक परिष्कृत घरांनी हस्तनिर्मित फर्निचर, डिझायनर अपहोल्स्ट्री आणि हेरिटेज डेकोरची मागणी वाढवली. आता आधुनिक घरांमध्ये भारतीय कारागिरीचे प्रदर्शन पाहावयास मिळते, ज्यामुळे फॅशनच्या पलीकडे जाऊन अंतर्गत सजावट आणि उच्च राहणीमानासाठी हस्तनिर्मित कापडांची मागणी वाढली आहे.
भारताच्या जागतिक फॅशन नेतृत्वाची पहाट
भारताचा कापड उद्योग आता फक्त उत्पादनापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो नावीन्यपूर्णता, डिझाइन आणि जागतिक प्रभावापर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘मेक इन इंडिया’ ‘डिझाइन इन इंडिया’ मध्ये परिवर्तित झाला आहे, जिथे भारतीय सर्जनशीलता आंतरराष्ट्रीय फॅशनला आकार देते. संशोधन-विकासावर भर देण्याच्या तसेच भरभराटीच्या स्टार्ट अप परिसंस्थेच्या भरभराटीकडे सरकारचे विशेष लक्ष असल्याने अतुलनीय आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कापड, पर्यटन आणि तंत्रज्ञान या तीन टी वर काम करून भारत विकसित भारताचा पाया रचत आहे. अलिकडच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला प्राधान्य दिल्याने १३६ अब्ज डॉलर्सचा देशांतर्गत उद्योग २०३० च्या आधीच २५० अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्यासाठी सज्ज झाला आहे, ज्यामुळे जागतिक आघाडीवर भारताचे स्थान पुन्हा दृढ होईल. २०१३ मध्ये असणारा ८७ लाख कोटी रुपये खाजगी वापर २०२४ मध्ये १८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०३० पर्यंत जीडीपी ६३५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे आणि खाजगी वापर जीडीपीच्या जवळपास ६०% असेल. या बदलामुळे भारत जागतिक उपभोगाचे ऊर्जाकेंद्र होऊन अमेरिका, चीन आणि जर्मनी यासारख्या विकसित देशांनाही मागे टाकेल. पण भारताचा उदय फक्त किती वापर होतो, यावर अवलंबून नाही, तर तो कशाचे मूल्यमापन केले जात आहे यावर आहे. एकेकाळी उत्पादन केंद्र म्हणून पाहिला जाणारा भारतीय कापड उद्योग आता जागतिक फॅशन कल निश्चित करीत आहे. जग भारताकडे केवळ त्याच्या कारागिरीसाठी नाही तर त्याची दूरदृष्टी, अभिजातता आणि वारशाला आधुनिकतेशी जोडण्याची क्षमता यासाठी पाहत आहे.
हा नवीन भारत आहे – निर्भय, स्वयंनिर्मित आणि दुर्दम्य
परंतु ही फक्त सुरुवात आहे. नवीन भारत संधींची वाट पाहत नाही, तर त्या निर्माण करतो. फॅशन आता फक्त एक आवड राहिलेली नाही, ते एक करिअर आहे. तरुण भारतीय फक्त ट्रेंडचे अनुसरण करत नाहीत, तर ते त्यांना घडवून आणत आहेत. ते ब्रँड सुरू करत आहेत, व्यवसाय उभारत आहेत आणि अर्थव्यवस्थेला आकार देत आहेत. भारतातील तरुणांनो – नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना. तुमची शैली, तुमची महत्त्वाकांक्षा, तुमच्या कल्पना – हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे भविष्य आहे आणि ते पोशाखापाशी थांबत नाही. भारताची अर्थव्यवस्था जसजशी वाढत आहे तसतशी त्याची अभिजाततेची भूक देखील वाढत आहे. वाढते उत्पन्न, वाढलेली डिजिटल पोहोच आणि वाढत्या लोकसंख्येसह भारत केवळ जागतिक फॅशन उद्योगात सहभागी होत नाही – तो त्याचे नेतृत्व करत आहे. पिरॅमिडच्या तळापासून वरपर्यंत आकांक्षा वाढत आहेत, पर्यायांचा विस्तार होत आहे आणि नवीन भारत मर्यादांद्वारे नव्हे तर शक्यतांद्वारे परिभाषित केला जात आहे.