मनाचा गाभारा – अर्चना सरोदे
पूर्वी देवळात गेल्यावर जी मन:शांती मिळायची ती बहुतेक कुठेतरी हरवली गेली. फार कमी देवळांमध्ये देवाच्या दर्शनाने मानसिक समाधान मिळतं. नाहीतर बहुतेक ठिकाणी, तर आपण दर्शन घेतले की नाही या संभ्रमातच देवळाच्या बाहेर पडावं लागतं.
खरं सांगायचं झालं तर आजकाल जे तिर्थक्षेत्रांचं बाजारीकरण झालंय ना त्यावरून मला असं वाटू लागलंय. जणू देव देवळातच नाही. आता हेच बघा ना, एवढ्या दुरून आपण तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जातो. तासनतास रांगेत उभे राहून (व्हिआयपी पास विकत घेऊनही रांगेसाठी दोन ते तीन तास) जेव्हा दर्शन घेण्याची वेळ येते तेव्हा देवाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी आधीच मान खाली घालून पुढे जावं लागतं आणि मान वर करून एक क्षण देवाकडे पाहत सुद्धा नाही की लगेच पुढे ढकलले जातो. मिळते का हो मन:शांती दर्शन घेतल्यावर… नाही ना? उलट मनाला हुरहूर लागते अरे मन भरून दर्शन नाही झालं… अजून दोन मिनिटे थांबता आलं असतं तर डोळे भरून दर्शन घेतले असते. मग प्रश्न असा पडतो की, का एवढा अट्टाहास असतो आपला तीर्थक्षेत्री जाण्यासाठी? भगवंत फक्त तीर्थक्षेत्रीच भेटतो का? घरातल्या देवाची पूजा करायला वेळ नाही म्हणून आपण दहा मिनिटांत पूजा आटपतो. पण मंदिरात मात्र तासनतास रांगेत उभे राहायला तयार असतो. घरातला आणि देवळातला देव वेगळा आहे का हो? का मग देवळातला म्हणून तो व्हीआयपी… आणि घरातला बाप्पा मात्र रोजचाच म्हणून त्याला महत्त्वच नाही. त्यापेक्षा आपण घरी शांत चित्ताने आणि समर्पित भावाने जेव्हा देवाची पूजा करतो ना एक वेगळाच आनंद मनाला मिळतो. तो आनंद तुम्हां आम्हांला एक नवी उर्जा देऊन जातो. आणि मग तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी ही उर्जा संकटांवर मात करण्यासाठी उपयोगी पडते. म्हणून देवळात धडपडत जाऊन दर्शन घेण्यापेक्षा घरी केलेल्या पूजेने आपलं मन अधिक प्रसन्न होतं. तासनतास रांगेत उभे राहून देवळातला देव नवसाला पावतो मग घरातल्या देवाला तुम्ही श्रद्धेने काही मागितलं तर तो देणार नाही का? देव तर तोच आहे ना. एखाद्या गरजूंना मदत करताना, मुक्या प्राण्यांची काळजी घेताना, वृद्धांसाठी थोडा वेळ काढून त्यांच्याशी बोलताना, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या करताना आपल्या मनाला आनंद मिळतो आणि हा मिळालेला आनंद म्हणजेच आत्मानंद. हाच तर खरा देव आहे. परमेश्वर हा सगळीकडे आहे. तुम्ही मैदानात जरी हात जोडून श्रद्धेने त्याच्याकडे काही मागितलं ना तर तो नक्कीच देईल. पण हो ती श्रद्धा, ती भक्ती अढळ हवी. हृदयातून असायला हवी.
एका प्रवचनात एक आख्यायिका ऐकली होती. वृंदावनमध्ये एक स्त्री नेहमी पहाटे उठून स्वयंपाक बनवायची आणि कृष्णाला सगळ्यात आधी नैवद्य दाखवायची. कारण तिला भीती वाटायची की जर तिला उशीर झाला, तर देवळात दाखवले जाणारे नैवेद्य खाऊन कृष्णाचे पोट भरेल आणि तो मी दाखवलेला नैवेद्य खाणारच नाही. म्हणून ती उठल्या उठल्या आधी स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायची आणि मग बाकीची कामे व आंघोळ करायची.
एकदा तिची शेजारीण तिला म्हणाली तू हे चुकीचे करत आहे. देवाला कोण आंघोळ न करता नैवेद्य दाखवत. तू आंघोळ केल्याशिवाय नैवेद्य दाखवला, तर तुला पाप लागेल.
तिने विचार केला पाप लागण्यापेक्षा आंघोळ करून नैवेद्य दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी तिने सर्व कामे आवरली आणि मग आंघोळीसाठी गेली व नंतर स्वयंपाक बनवून कृष्णाला नैवेद्य दाखवला. इकडे मंदिरात मात्र सगळे तयार नैवेद्य असताना कृष्ण खातच नव्हता. कुणालाच कळेना की आज नेमकं काय झालं… देव आज देवळातच नाही. असं कसं झालं. पूजाऱ्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. नक्की काय झालं असावं याचाच पूर्ण दिवस तो विचार करत होता… रात्री पूजाऱ्याला दृष्टांत झाला. कृष्णाने घडलेला प्रकार त्याला सांगितला. “नेहमी प्रमाणे सकाळी मी त्या बाईकडे जेवणासाठी गेलो. पण दुपार झाली तरी जेवणाचा पत्ताच नाही. दुपारनंतर जेवायला मिळालं. नेहमी सकाळी जेवतो.पण आज दुपारी जेवलो म्हणून भूकच लागली नाही. नेहमी गेल्या गेल्या जेवायला मिळतं पण आज तिने आधी बाकीची कामं केली आणि मग मला जेवायला दिलं आणि म्हणून आज मंदिरात मला नाही येता आलं. “थोडक्यात सारांश असा की देव फक्त भावाचा भुकेला आहे. हे आपण आपल्या संतांच्या वाणीतून ऐकत आलो आहोत. देवळात जाणाऱ्यांच्या मनात जर आढळ श्रद्धा नसेल, विश्वास नसेल आणि तरीही लोक लाजे खातर केवळ दिखाव्यासाठी देवळात जातात त्यांच म्हणजे असं झालं की “मनीं नाही भाव; अन् देवा मला पाव”. देवाशी तुमचं नातं जोडलं गेलं पाहिजे. जसं की आई आणि मुलाचं नातं.
आपल्याला जितकी भगवंताची ओढ लागते त्यापेक्षा कैकपटीने जास्त भगवंताला आपल्या भक्तांच्या प्रेमाची ओढ असते. यासाठी भक्ती सुद्धा तितकीच समर्पित असायला हवी; परंतु प्रश्न असा पडतो की आपण अशा भक्तांमध्ये गणले जातो का? मनाशी विचार केला तर उत्तर नाही असेच येईल. कारण आपल्याला भक्ती न करता मुक्ती हवी असते. आयुष्यात कठीण प्रसंग आले की आपण लगेच देवाला वेठीस धरतो. मग अशावेळी ती श्रद्धा, ती भक्ती कुठे जाते? पण आपण मात्र त्यालाच दुषणे देतो आणि तो म्हणजे नुसती “बघ्याची भूमिका घेणारा” हे लेबल लावून मोकळे होतो. खरे भक्त देवाला कधीच दुषणे देत नाहीत. तो जे करतो आपल्या चांगल्यासाठीच करतो अशीच त्यांची श्रद्धा असते. काहीजण अस्तित्व नाकारणारे ही बघायला मिळतात आणि म्हणूनच कदाचित अशा स्वार्थी भक्तांना आपल्या (नसलेल्या) भक्तिचं प्रदर्शन मांडताना बघून देवही खऱ्या भक्तिच्या शोधात देव देवळातून बाहेर पडला असेल. अशा वेळी गदिमांच्या भक्तिगीताची ओळ आठवते…
“ देव देव्हाऱ्यात नाही, देव
नाही देवालयी”…