
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई : राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे. या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी (Job In German) उपलब्ध होणार आहे. नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सांगितले.
जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून राज्य नाविन्यता सोसायटी येथे त्यांनी भेट दिली. यावेळी लोढा बोलत होते. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील कोनार्ड नेफु यांच्या नेतृत्वात फ्लोरीयन लेपोर्ड, ज्योहेन मान, अँडरेज हॉर्नार, बेटे वाग्नेर हे शिष्टमंडळात उपस्थित होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल,राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख आणि महाराष्ट्र रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यावेळी उपस्थित होत्या.
लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताला जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पुढे घेऊन जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या धोरणाला गती देण्यात येत आहे. जर्मनीतील सर्वात प्रगत बाडेन-वूटेनबर्ग राज्यासोबत करार करून मराठी होतकरू तरुणांना परदेशात नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त होण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. केवळ रोजगाराचा नाही तर त्या रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मन भाषेचे ज्ञान देण्याचा अभिनव उपक्रमही सुरु केला आहे. असेही ते म्हणाले. (Job In Germany)