मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद गुरुवार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सालियन मृत्यू प्रकरणी आरोप असलेल्या माजी मंत्र्यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांचा रोख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दिशेने होता. तर विधान परिषदेतही सत्ताधारी पक्षाने हीच मागणी लावून धरत दिशा सालियन मृत्यूची चौकशी केलेल्या एसआयटीचा अहवाल खुला करण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज एकदा तर विधान परिषदेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.
गुरूवारी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.दिशा सालियनचा मृत्यू जून २०२० मध्ये झाला. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये एसआयटी स्थापन केली.आता दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, शी मागणी आमदार साटम यांनी केली. या मागणीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी समर्थन केले.
त्यानंतर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे,अशांना अटक केली जाते. त्यामुळे आघाडी सरकारमधील माजी मंत्र्याला त्वरित अटक करून चौकशी करावी,अशी मागणी राणे यांनी केली.सामान्य माणसाला जो न्याय तोच न्याय माजी मंत्र्यांना लावण्यात यावा,असेही राणे म्हणाले.यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. दिशा सालियन प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना अटक करून त्यांची चौकशी करावी,असे देसाई म्हणाले.
यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सालियन मृत्यूची चौकशी करणाऱ्या एसआयटीचा अहवाल अद्याप सरकारला सादर झालेला नाही. चौकशी अजूनही सुरू आहे. ही चौकशी जलदगतीने पूर्ण केली.आता पीडितेच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे.राज्य सरकार देखील या प्रकरणात पक्षकार आहे. त्यामुळे सरकार आता न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही करेल. कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे कोणालाही सोडले जाणार नाही,असे कदम यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या आमदारांनी दिशा सालियनचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. ठाकरे गटाचे आमदार राजभवनवर राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी किल्ला लढवत आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. यावेळी विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. राहुल नार्वेकर यांनी गोंधळातच लक्षवेधी सूचना पुकारल्या. मात्र, सभागृहातील गदारोळ लक्षात घेऊन त्यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
विधानपरिषदेत गोंधळ
दरम्यान, विधानपरिषदेत शिंदे गटाच्या मनीषा कायंदे यांनी शून्य प्रहरात दिशा सालियान प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्याला ठाकरे गटाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामकाजावर आक्षेप घेत, अशा पद्धतीने ग्रामपंचायतीचेही कामकाज चालत नाही. कुणीही कोणत्याही पद्धतीने नियमात नसताना मुद्दा उपस्थित करतात हे बरोबर नाही, असे म्हणत सभापतींकडे नियमानुसार कामकाज करण्याची मागणी केली. अनिल परब यांनीही सभापतींच्या कामकाजावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, सभापती हे सभागृहातील सर्वोच्च आहेत. हे न्यायपीठ आहे. सभापतींची खुर्ची ही गावच्या चौकातील नाही, ती न्यायपीठातील आहे. तुमच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही, या एका सबबीखाली तुम्ही कामकाज करून निर्णय घेत आहात. घटनेची मोडतोड होत आहे. कामकाजाची मोडतोड होत आहे.
शून्य प्रहरात दिशा सालियानचे प्रकरण कसे काय मांडू दिले?, मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटात असताना सीबीआयने ठाकरे यांना क्लिन चीट दिली असल्याचे एक ट्विट केले होते. त्यात राणे पिता पुत्रांवर टीका केली होती. त्यामुळे आता त्या मुद्दा मांडत आहेत,असे सांगत अनिल परब त्यांच्यावर रंग बदलणाऱ्या एका प्राण्याची उपमा दिली.त्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ते शब्द कामकाजातून काढून टाकण्यात आले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिवसेना-भाजपचे आंदोलन
दिशा सालीन संशयास्पद मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी केलेल्या उच्च न्यायालयातील आरोपांवरून आदित्य ठाकरे यांना तत्काळ अटक करा दोषींवर कठोर कारवाई करा अशा मागणीसाठी सत्ताधारी शिवसेना तसेच भाजपाच्या आमदारांनी सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.