मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव केला आहे. बीसीसीआयने भारतीय संघासाठी ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. प्रत्येक खेळाडूला ३ कोटी रुपये, मुख्य प्रशिक्षकाला ३ कोटी रुपये आणि सहाय्यक प्रशिक्षक स्टाफला ५० लाख रुपये मिळतील, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयशी बोलताना दिली.
नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेमधील एकही सामना न गमावत भारताने विजेतेपद पटकावले. ३ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ पहिला संघ बनला आहे. भारतीय संघाच्या या विक्रमी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून भारतीय संघासाठी ८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ही आर्थिक मान्यता खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी आणि पुरुष निवड समितीच्या सदस्य या सर्वांच्या सन्मानार्थ देण्यात येत आहे.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून विजेतेपद पटकावले. हे भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद होते. यापूर्वी २०२४ मध्ये भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला होता.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडने ५० षटकांत सात विकेट्स गमावून २५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४९ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहितने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने ७६ धावा करून भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी होती. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. त्याने सलग पाच सामने जिंकले होते. गट फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला आणि अंतिम फेरीत पुन्हा किवी संघाला हरवले.
आयसीसीकडून खेळाडूंवर पैशांचा वर्षाव
विजेता झाल्यानंतर, विजेत्या भारतीय संघावर बक्षिसांच्या स्वरूपात पैशांचा पाऊस पडला. भारतीय संघाला २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे १९.५ कोटी रुपये मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत गेल्या वेळेच्या तुलनेत ५३ टक्के वाढ केली होती. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६० कोटी रुपये) पर्यंत वाढली. विजेत्या संघाव्यतिरिक्त, उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १.१२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९.७२ कोटी रुपये) मिळाले, तर उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या दोन्ही संघांना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला ५६,००० डॉलर्स (४.८६ कोटी रुपये) मिळाले.
रॉजर बिनी यांनी केले भारतीय संघाचे कौतुक
भारतीय संघाला पारितोषिक जाहीर कराताना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिनी यांनी भारतीय संघाचे कौतुक केले. अध्यक्ष बिनी म्हणाले की, ‘आयसीसीचे सलग दोन विजेतेपद जिंकणे हे विशेष आहे आणि हे बक्षीस जागतिक स्तरावर टीम इंडियाच्या समर्पणाची आणि उत्कृष्टतेची ओळख पटवते. रोख पारितोषिक म्हणजे पडद्यामागे प्रत्येकाने केलेल्या कठोर परिश्रमाची पावती आहे. आयसीसी १९ वर्षांखालील महिला वर्ल्ड कप विजयानंतर २०२५ मध्ये ही आमची आयसीसी ट्रॉफी होती आणि ही आपल्या देशातील मजबूत क्रिकेट परिसंस्थेला अधोरेखित करते’.