Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

नागपूर दंगल प्रकरणी १२५० हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल

नागपूर दंगल प्रकरणी १२५० हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल

नागपूर : नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 1250 हून अधिक संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मिडीया पोस्ट आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिस पोलिसांनी 6 गुन्हे नोंदवले आहेत. नागपुरातील कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 200 जणांची ओळख पटवून 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीवर हिरव्या रंगाची चादर टाकून जाळली. त्यामुळे समाज माध्यमांवर विविध अफवा पसरल्या व सायंकाळी दंगल पेटली. भालदारपुरा, हंसापुरीत अनेक वाहनांची जाळपोळ केली. सोबतच शंभरावर वाहनांची तोडफोड करीत पोलिसांवरदेखील दगडफेक केली. त्यात 35 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.


अतिरिक्त कुमक मागवत भालदारपुरा, चिटणीस पार्क येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी 50 हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तीन पोलीस ठाण्यांत एकूण 6 गुन्हे दाखल झाले आहेत. दंगलग्रस्त परिसरातील जवळपास 100 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये दिसणाऱ्या संशयितांची माहिती पोलिसांनी गोळा केली. सीसीटीव्ही फुटेजमधील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेणे सुरु केले असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

Comments
Add Comment