
आज विधानभवनात परिवहन मंत्री सरनाईक यांनी राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयांवर एक बैठक आयोजित केली होती.यावेळी आमदार विक्रांत पाटील,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार विजय देशमुख,आमदार दौलत दरोडा, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख उपस्थित होते.
स्थानिक आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री सरनाईक यांनी हे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.तसेच नांदेड येथील सांगवी येथे नव्या बसस्थानकाच्या कामालाही गती देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या.यासंदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील पाठपुरावा केला. दरम्यान, शहापूर येथील नवीन बस पोर्ट,सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम देखील वेगाने पूर्ण करावे आणि पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून तात्पुरत्या शेड्स उभारण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले.वाढते शहरीकरण, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बस पोर्ट उभारणीला प्राधान्य द्या, अशी मागणी आमदार दौलत दरोडा आणि विजय देशमुख यांनी यावेळी केली.