Monday, May 12, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

Maharashtra State Drama Competition : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘मीडिआ’ नाटक प्रथम

Maharashtra State Drama Competition : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘मीडिआ’ नाटक प्रथम

मुंबई : हौशी कलाकार व तंत्रज्ञांमधील कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे’ आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या ६३ व्या पर्वात गोव्यातील रुद्रेश्वर या संस्थेच्या ‘मीडिआ’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावत ६ लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. तर पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालयाच्या ‘मून विदाउट स्काय’ या नाटकाने ४ लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि मुंबईतील माणूस फाऊंडेशनच्या ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ या नाटकाने २ लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले.



वांद्रे येथील रंगशारदा नाट्य मंदिर येथे १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत उत्साहवर्धक वातावरणात रंगलेल्या अंतिम फेरीत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर झाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवदास घोडके, रवींद्र अवटी, संजय पेंडसे, प्रदीप वैद्य आणि शंकुतला नरे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावलेल्या नाट्यसंघाचे आणि इतर पारितोषिकप्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.


दरम्यान, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी गंगाराम नार्वेकर (नाटक – मीडिआ) यांनी प्रथम पारितोषिक, मुकुल ढेकळे (नाटक – मून विदाउट स्काय) यांनी द्वितीय पारितोषिक आणि डॉ. सोमनाथ सोनवळकर (नाटक – द फिलिंग पॅराडॉक्स) यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. तर या नाटकांसह इतरही नाटकांनी सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, संगीत दिग्दर्शन, अभिनय पारितोषिकांवर विजयी मोहोर उमटवली. ‘राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकारांनी मेहनत घेऊन नाट्यप्रयोग सादर केले. या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दादही दिली. भविष्यातही विविध संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment