Monday, April 21, 2025
HomeमहामुंबईSparrow : शहरांच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे घटली चिमण्यांची संख्या

Sparrow : शहरांच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे घटली चिमण्यांची संख्या

प्रशांत सिनकर

एकेकाळी घराघरांत सहज दिसणाऱ्या चिमण्या आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. पूर्वी चिमण्यांच्या गोष्टी सांगत लहान मुलांना जेवण भरवले जायचे, पण आज वास्तव वेगळे आहे. मुंबई-ठाणे सारख्या शहरांमध्ये वाढते शहरीकरण, मोबाईल टॉवरमधून निघणारे किरण, वाढता ध्वनी आणि हवेचे प्रदूषण यांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे सांगितले जाते. २० वर्षांपूर्वी कावळे, घारी, कबुतरांसोबतच चिमण्याही मोठ्या संख्येने दिसायच्या. मात्र, शहरांच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे त्यांची संख्या घटली आहे. चिमण्यांच्या संख्येत वाढ झाली की घट, याबाबत ठोस वैज्ञानिक अभ्यास नाही. त्यामुळे या विषयावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.

शहरांमध्ये चिमण्यांची संख्या टिकवण्यासाठी अनेक संस्था आणि पक्षीमित्र प्रयत्नशील आहेत. झाडांचा आधार घेऊन लाकडी कृत्रिम घरटी बसवली जात आहेत. या घरट्यांजवळ चिमण्यांसाठी धान्य आणि पिण्याचे पाणी ठेवले जात आहे. काही नागरिकांनी घराच्या खिडकीवर पाणी आणि दाणे ठेवण्यासाठी खास व्यवस्था केली आहे.

भारतामध्ये आढळणारे चिमण्यांचे प्रकार

मुंबई ठाण्यात हाऊस स्पॅरो ही चिमणी सर्वांना सुपरिचित आहे. चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, छातीच्या भाग काळा , डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा या सोबतच संजयगांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया ही चिमणी आढळून येते. ही चिमणी साधारण हाऊस स्परो सारखीच असून तिच्या मानेखाली पिवळ्या रंग असतो.भारतात रसेट स्पॅरो, युरेशियन ट्री स्पॅरो, सिंध स्पॅरो, स्पॅनिश स्पॅरो असे सात ते आठ प्रकारच्या चिमण्या आढळतात, अशी माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.

चिमण्यांचे आवडते ठिकाण

चिमण्यांच्या संख्येबाबत मतभेद असले तरी काही भागांत चिमण्यांचे थवे नक्कीच पाहायला मिळतात. मुंबई-ठाणे परिसरातील मलबार हिल, हिंदू कॉलनी, धारावी नेचर पार्क, विक्रोळी पार्क साईट, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पारसिक डोंगर आणि ठाणे खाडी किनारा येथे चिमण्यांची चिवचिव ऐकू येते. नागरी वस्त्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी चिमण्यांचा किलबिलाट सहज ऐकायला येतो.

चिमण्यांचे रक्षण – आपल्या हातात!

चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण घराच्या खिडक्यांवर आणि अंगणात दाणे व पाणी ठेवू शकतो. तसेच झाडे लावून आणि कृत्रिम घरटी बसवून चिमण्यांना सुरक्षित अधिवास निर्माण करून देणे आवश्यक आहे. चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकण्यासाठी आता सर्वांनी एकत्र यायला हवे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -