मुंबई : सध्या जगभरात आर्थिक मंदी सुरु असून सर्वसामान्यांसह अनेक मोठ्या कंपन्यांनाही मंदीचा सामना करावा लागत आहे. जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या अमेझॉन कंपनीवर देखील आर्थिक मंदीचे सावट असून याचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीच्या खर्चात घट करण्यासाठी कंपनीने काही कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Amazon layoffs)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेझॉन कंपनीने तीन वर्षांपूर्वी केलेल्या मोठ्या कर्मचारी कपातीनंतर आता पुन्हा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. यामध्ये तब्बल १४ हजार व्यवस्थापकांच्या पदावरील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या कठोर पावलानंतर कंपनीचा दरवर्षी २.१ अब्ज ते $३.६ अब्ज अतिरिक्त खर्च वाचणार आहे. यामुळे कंपनीने (Amazon layoffs) हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी अमेझॉनच्या कम्युनिकेशन्स अँड सस्टेनेबिलिटी युनिटमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. टीमची पुनर्रचना करून कामकाज सुरळीत करण्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. दरम्यान आता बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, सीईओ अँडी जॅसी यांच्या आदेशानुसार ही कपात केली जात आहे. तसेच नोकर कपातीनंतर कंपनी पगार रचनेचा आढावा घेणार असून वरिष्ठ पदांसाठी भरती मर्यादित करणार असल्याचे म्हटले (Amazon layoffs) जात आहे.