Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीMuktai : संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने घेतले विशेष प्रशिक्षण

Muktai : संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीने घेतले विशेष प्रशिक्षण

मुंबई : एखाद्या थोर व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. दिवसरात्र मेहनत घेऊन त्या भूमिकेचा अभ्यास केला जातो. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर कलाकाराची जबाबदारी अधिक वाढते. छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा थोर संत यांच्या भूमिका साकारताना अभिनेत्याला तारेवरची जणू कसरतच करावी लागते. अशीच एक युवा कलाकार अभिनेत्री नेहा नाईक दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून संत मुक्ताईची (Muktai) भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या १८ एप्रिला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेहा नाईक पुण्यातील रंगभूमीवर अतिशय उत्तमरीत्या कार्यरत असून आता ती या चित्रपटात मुक्ताईच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी नेहाने खास वाणीचे प्रशिक्षण घेतल्याचे म्हटले जात आहे. पुण्यातील ज्येष्ठ नाट्यगुरू प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडे तब्बल तीन महिने वाणी संस्काराचे धडे गिरवले. मुक्ताई यांनी आपल्या अल्पकालीन आयुष्यात जे अनुभवले आणि त्यायोगे जे भोगले त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून आणि काव्यातून उमटले आहे. या चित्रपटाची भाषा ही १३व्या शतकातील मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे उच्चारांमध्ये सहजता यावी यासाठी अनेक अवघड आणि कष्टप्रद अभ्यासाचे प्रकार नेहाला अभ्यासावे लागले. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे भाषेचा हा अभ्यास अत्यंत अनिवार्य होता.

Rangpanchami Bavdhan Bagad Yatra : बावधनची बगाड यात्रा म्हणजे काय ? ती कशी साजरी केली जाते ,जाणून घ्या

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नेहा सांगते, “या चित्रपटात काम करायचं म्हणजे आधी या चित्रपटाच्या संहितेवर प्रभुत्व मिळवायला हवं. म्हणून मी त्यातल्या भाषेच्या अभ्यासावर भर दिला. प्रा. श्यामराव जोशींची शिकवण्याची पद्धत अत्यंत शिस्तशीर आणि प्रभावी असल्याने हळूहळू ती भाषा मला आत्मसात व्हायला लागली. यातील संवादांच्या अनेक दिवस तालमी चालू होत्या. भाषेबरोबरच ते शब्द उच्चारताना स्वाभाविकपणे होणारी देहबोली कशी असेल याचे दिग्पाल दादाने धडे दिले. त्याकरता माझ्या गावी जाऊन तिथल्या महिलांच्या देहबोलीचे निरीक्षण मी केले. वयाच्या आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतकी कस लावणारी तरीही सुंदर प्रक्रिया मला अनुभवायला मिळाली हा मी मुक्ताईचा आशीर्वादच समजते. चित्रपटात मृणाल कुलकर्णींसारख्या अनुभवी कलाकारांना काम करताना पाहताना माझे एक वेगळेच प्रशिक्षण झाले. अभिनय या बाबतीत या सिनेमाने मला नवा दृष्टिकोन दिला. म्हणून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’हा चित्रपट माझ्यासाठी कायम हृदयाच्या जवळ असणार आहे.”

कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह किंवा प्रतिमा या भावंडांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांसोबत येऊ नयेत यासाठी ऑडिशन घेऊन सुमारे दिडशे तरुणींमधून नेहाची निवड केल्याचं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “नेहा जरी नवखी असली तरी तिने खूप मेहनत घेऊन आपली व्यक्तिरेखा चित्रपटात आत्मविश्वासाने साकारली आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटामध्ये नेहाने साकारलेल्या ‘संत मुक्ताई’ द्वारे आजच्या पिढीला भाऊ-बहिणीच्या नात्याची नव्याने ओळख व्हायला मदत होईल अशी मला खात्री आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -