सातारा : महाराष्ट्रात मैलामैलावर भाषा बदलतात त्याचप्रमाणे सण समारंभ साजरे करण्याची पद्धतही बदलते. महाराष्ट्रात होळीच्या आधी आणि नंतरच्या काही दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जत्रा आणि यात्रांचे दिवस सुरू होतात. या दिवसांत गावागावात चाकरमान्यांची मांदियाळी पाहायला मिळते. शहरांकडे पाठ फिरवून प्रत्येकजण गावाच्या दिशेने रवाना होतो. अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या या दिवसांना निमित्त ठरतं ते म्हणजे गावच्या ग्रामदेतवांच्या यात्रा आणि पालख्यांचं. अशाच पद्धतीची एक आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय असणारी लोकप्रिय यात्रा म्हणजे साताऱ्याच्या बावधनची (Bavdhan) ‘बगाड यात्रा’.(Bagad Yatra)
साताऱ्यात दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बावधन या गावात बगाड यात्रा भरवली जाते. जवळपास साडेतीनशे वर्षांपासून या यात्रेची परंपरा असून, ही ऐतिहासिक आणि तितकीच पारंपरिक यात्रा ब्रिटीश काळापासून सुरू आहे. दरवर्षी फाल्गुन कृष्णपंचमी अर्थात रंगपंचमीच्या दिवशी या यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेमध्ये बगाडाला अनन्यसाधारण महत्त्वं. ‘अगंबाई अरेच्चा!’ या चित्रपटानंतर या यात्रेला अधिक ओळख मिळाली. तसेच ‘जाऊ बाई गावात’ या झी मराठीच्या रिऍलिटी शो नंतर या गावाला लोकप्रियता मिळाली.
नेमकी बगाड यात्रा असते तरी काय ?
या यात्रेची सुरुवात मायपौर्णिमेच्या दिवशी होते. याच दिवशी या बगाडाला लागणारे बांबू तोडले जातात. ते जोडल्यानंतर बगासाठीची लाकडं तोडली जातात. पुढे होळीच्या दिवशी रात्री १२ वाजता देवाला कौल लावला जातो. साधारण ५० लोकांमध्ये हा कौल लागतो आणि एकाच्याच बाजूनं उजवा कौल पडतो. बगाड म्हणजे बैलांनी ओढला जाणारा एक मोठा गाडा. असा गाडा ज्याला दगडी चाकं असतात आणि तो अतिशय बळानं ओढला जातो. दगडी चाकं, त्यावर कणा आणि लांब खांबांवर शीड अशी बगाडाची रचना असते. बगाडाच्या शीडाला नवसाच्या बगाड्याला टांगण्यात येतं. ज्यांचा नवस पूर्ण होतो अशाच व्यक्तीला बगाड्याचा मान दिला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील या अतिशय मानाच्या यात्रेचा उत्साह तब्बल चार दिवस चालतो. यामध्ये पहिल्या दिवशी देवाचं लग्न, दुसऱ्या दिवशी तिखटाचं जेवण, तिसऱ्या दिवशी छबिना आणि शेवटच्या दिवशी बगाड यात्रा निघते. यावेळी गुलालाची मनसोक्त उधळण करत बगाडावर खोबरं उधळत ही यात्रा बगाडासहीत पुढे जाते. बगाड्याचा या यात्रेच्या दिवशी उपवास असून, रात्री ताक पिऊन हा उपवास सोडण्याची प्रथा असल्याचं म्हटलं जातं. या यात्रेला संपूर्ण पंचक्रोशीतून लोक हा उत्सव पाहायला येतात.