Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमानसशास्त्रीय संकल्पना-सायलेंट ट्रीटमेंट

मानसशास्त्रीय संकल्पना-सायलेंट ट्रीटमेंट

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

आज आपण एका नवीन मानसशास्त्रीय संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. आपण खूपदा असे अनुभवतो की घरात, समाजात, कार्यालयात काही लोकं अचानक आपल्याशी पूर्णपणे बोलणं बंद करतात, संवाद कमी करतात अथवा बोलले तरी अगदी औपचारिकता म्हणून किंवा कामापुरते बोलतात. आपल्याशी आधी अगदी मनमोकळे, हसून-खेळून बोलणारे, खूप गप्पा मारणारे, भेटणारे, फोन करणारे सारखं मेसेज करणारे आपल्या प्रत्येक सुखंदुःखात सहभागी होणारे लोकं जेव्हा अशी अचानक वागणूक बदलतात तेव्हा आपल्याला खूप धक्का बसतो. वाईट वाटतं, नेमकं काय झालं समोरच्या व्यक्तीला हे कळेनासं होतं. त्याला काही विचारावं तर तो स्पष्ट काहीच बोलत नाही, सांगत नाही. त्याच्या अशा वागण्याने आपण मात्र हैराण होऊन जातो, सतत त्याचा विचार करू लागतो, सारखं सारखं स्वतःला विचारत राहतो की आपलं काही चुकलं का? आपल्याकडून काय घडलं की समोरील व्यक्ती इतकी बदलली. काही गैरसमज झाला का? अनेक प्रश्न आपल्या मनात येत राहतात. जेव्हा समोरचा आपल्याशी असं वागतो तेव्हा तो आपल्याला सायलेंट ट्रीटमेंट देत असतो हे प्रथम लक्षात घ्या.

अनेक लोकांचा स्वभाव असा असतो की ते विनाकारण समोरच्याला मानसिक त्रास होईल, तो स्वतःला अपराधी समजेल, त्याला स्वतःवर विश्वास राहणार नाही अशी वागणूक देऊन त्याला खालची पातळी दाखवायची. मुळात आपण विचार करतो, आपलं काही चुकलं म्हणून समोरच्याने आपल्याशी बोलणं कमी केलं अथवा बंद केलं का? परंतु तसे काहीही नसते आपलं मानसिक खच्चीकरण व्हावे, आपण मनातून डिस्टर्ब व्हावे, सतत आपल्याला काय झालं नेमकं याची चुटपूट लागून राहावी म्हणून सायलेंट ट्रीटमेंट दिली जात असते.

अशा वेळी आपल्याशी बोललं जरी गेलं तरी ते खूप तुटकं, मोजकं, उपकार केल्यासारखं असतं जेणेकरून आपण अधिक दुःखी होतो, निराश होतो. कालपर्यंत आपल्याशी सगळं व्यवस्थित नातं असलेली व्यक्ती अचानक बदलते तेव्हा आपण सतत त्याच व्यक्तीचा विचार करतो. आपलं कशातचं मन लागत नाही, आपल्याला काही सुचत नाही आणि समोरील व्यक्तीला हेच पाहायचं असत की आपण कसं सैरभैर झालो आहोत. अनेकदा आपण स्वतः पुढाकार घेऊन, कमीपणा घेऊन अशा व्यक्तीशी बोलण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. समोरील व्यक्ती त्याच पद्धतीने आपल्याला सायलेंट ट्रीटमेंट देत राहते. अशी वागणूक जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा अजिबात पॅनिक होऊ नका. पहिले स्वतःला हे समजावून सांगा की आपलं काहीही चुकलेलं नाहीये, आपण कुठेही कमी पडलेलो नाहीये. समोरचा त्याच्या कुवतीनुसार, लायकीनुसार वागत आहे. त्याच्या मूडनुसार, इच्छेनुसार तो आपल्याशी खेळत आहे. आपल्याला त्रासलेलं पाहून त्याला असुरी आनंद मिळतोय, तो आपली मजा बघतोय.

आपल्याला जर कोणी सायलेंट ट्रीटमेंट देत असेल तर ती परिस्थिती स्वीकारा. सातत्याने भावनिक होऊन त्या व्यक्तीच्या मागे लागू नका, त्याला सतत तो का बोलत नाही, असं का वागतोय, माझं काही चुकलं का, मी काही तुला दुखावलं का, माझ्यामुळे तुला त्रास झाला का असं सतत विचारून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. कोणासमोर इतके लाचार होऊ नका की, तो तुम्हाला हवं तसं स्वतःच्या तालावर नाचवेल आणि तुम्ही त्याच्यामुळे सतत दोलाय मनस्थितीमध्ये राहाल. स्वतःला सतत अपराधी, चुकीचं अजिबात समजू नका. जी व्यक्ती तुमची आहे, हक्काची आहे, ज्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे, चांगले संबंध आहेत ती कधीच तुम्हाला अशा प्रकारे त्रास द्यायला सायलेंट ट्रीटमेंट देणार नाही. चांगल्या नात्यातील व्यक्ती तुमच्याशी बोलेल, चर्चा करेल, तुम्ही चुकले असाल तरी समजावून घेईल, समजावून सांगेल पण तुम्हाला त्रास होईल असं वागणार नाही.

कोणी आपल्याशी बोलणं कमी केलं अथवा बंद केलं म्हणजे आपण काहीतरी भयानक गुन्हा केला आहे असं समजून स्वतःला त्रास करून घेऊ नका. लोकं तुम्हाला गृहीत धरतात. आपण कधीही बोललो, नाही बोललो, कसेही बोललो तरी समोरचा सहन करतोय कारण त्याला नातं टिकवण्याची गरज आहे, असं चित्र तयार झाल्यावर तुमचा आत्मसन्मान, स्वाभिमान सगळं बाजूला ठेवून तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मूडनुसार वागावं लागतं.

आपल्याला पण असं गृहीत धरलेलं चालत नाही, आपल्याला पण राग येऊ शकतो, आपण पण एकट्याने नातं टिकवण्याचा ठेका घेतलेला नाही हे समोरच्या माणसाला लक्षात आणून द्या. तू बोलणं बंद करू शकतो तर मी पण तुझ्याशी न बोलता राहू शकते ही जाणीव समोरील व्यक्तीला होऊ द्या. काहीही कारण नसताना जर समोरचा केवळ मानसिक त्रास देण्यासाठी, तुमचा छळ करण्यासाठी अबोला धरत असेल तर त्याला पण तुम्ही कसे कमकुवत आहात, गरजू आहात हे जाणवू देऊ नका. तुमचा हाच स्वभाव माहिती असल्यामुळे समोरचा तुम्हाला सायलेंट ट्रीटमेंट देऊन त्याच्या समोर नमतं घ्यायला भाग पाडत असतो.

तुम्हाला कोणीही मॅनिप्युलेट करू शकेल इतके भावनिक पातळीवर पोकळ राहू नका. सायलेंट ट्रीटमेंट देणारी लोकं तुम्हाला त्यांच्या समोर झुकवण्यासाठी, कमीपणा घ्यायला लावण्यासाठी, स्वतःचा अहंकार शाबूत ठेवण्यासाठी असे वागत असतात. मला कशी तुझी अजिबात गरज नाही आणि तूच कसं परत परत माझ्याकडे येत आहे, बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे साध्य करणे म्हणजे त्यांचा इगो सुखावणे असते. आपल्याशी कोणी बोलेनासं झालं की आपण भावनेच्या भरात त्याला खूप फोन करतो, खूप मेसेज करतो, त्याला निरोप पोहोचवतो, त्याला भेटायला तडफडतो पण यातून आपण वैचारिक दृष्टीने किती कमकुवत आहोत, आपल्याला ठाम राहता येत नाही, आपण परिस्थिती हाताळू शकत नाही हेच सिद्ध होते. आपण एवढा आटापिटा करून पण समोरचा सायलेंट ट्रीटमेंट सुरूच ठेवतो तेव्हा आपण अक्षरशः वेड्यात निघतोय हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही.

आपल्याला कोणी सायलेंट ट्रीटमेंट देत आहे हे लवकर समजावून घ्या आणि ताबडतोब स्वतःची वागणूक पण बदला. त्या व्यक्तीबद्दल विचार करणं, त्याच्याबद्दल सतत बोलणं, वारंवार त्याची माहिती जाणून घेणं बंद करा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याशी नातं तोडायचं आहे किंवा संबंध कमी करायचे आहेत अथवा त्याला आपल्याला ठरावीक अंतरावर ठेवायचे आहे तेव्हा तो सायलेंट ट्रीटमेंटचा वापर करतो.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्याला आपण चुकीचे आहोत, आपण खूप मोठा अपराध केला आहे असं सिद्ध करायचं असतं किंवा तशी भावना आपल्याला द्यायची असते. तो सायलेंट ट्रीटमेंटचा वापर करून आपलं मानसिक खच्चीकरण करतो. त्यामुळे कोणाच्याही अशा प्रकारच्या वागणुकीचा स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका, स्वतःचं मनोबल, मनोधैर्य, आत्मविश्वास अशा सायलेंट ट्रीटमेंटमुळे घालवू नका. समर्थ राहा, सक्षम राहा आणि आपण जर खरे आहोत, सत्याच्या बाजूने आहोत तर खंबीर राहा.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -