
आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआय सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. ६ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे वेळापत्रक बदलेल अशी शक्यता आहे. या बदलामागील प्रमुख कारण रामनवमीचा सण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या दिवशी रामनवमीचा सण असल्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने बीसीसीआयला या सामन्याच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या दिवशी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे कठीण होईल. त्यामुळे सामन्याचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांबरोबर झाली विशेष बैठक
पश्चिम बंगालामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील राजकीय संघर्ष जगजाहीर आहे. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीनिमित्त २० हजार मिरवणुका आयोजित केल्या जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. म्हणूनच बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशीश गांगुली यांनी कोलकाता पोलिसांबरोबर मंगळवारी दोन बैठका घेतल्या. या बैठकीनंतर पोलिसांनी अद्याप ६ तारखेच्या सामन्यासाठी परवानगी दिलेली नसल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं. "आम्हाला या सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांचं संरक्षण नसेल तर ६५ हजार प्रेक्षकांना हाताळणं कठीण होईल," असे गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.