पोलिसांवर हल्ला; हिम्मत कशी झाली?

Share

महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून या नागपूरची ओळख आहे. नागपूरची संत्री देशात लोकप्रिय आहेत. ऑरेज सिटी हा नागपूरचा लौकिक आहे. नागपूरची माणसे स्वभावाने गोड असतात आणि त्यांचे वैदर्भिय आदरातिथ्यही आपलेसे करणारे असते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, हे नागपूरकर आज केंद्रात व राज्यात सत्तेच्या मोठ्या पदावर बसले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तर नागपूरचे पालकमंत्री आहेत. नागपूर हे सुशिक्षित व सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरला होत असते. मग नागपूरला अचानक हिंसाचार घडावा असे काय घडले? महाराष्ट्र विधिमंडळाचे मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना पाचशे मुस्लीम तरुणांचा जमाव रस्त्यावर येतो व मनसोक्त धुडगूस घालतो, तोडफोड, जाळपोळ, दगडफेक, पोलिसांना टार्गेट करून त्यांच्यावरच हल्ले केले जातात, पोलिसांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकले जातात, तीन उपायुक्तांसह तेहतीस पोलीस जखमी होतात, ही घटना नागपूरच्या निरोगी वातावरणाला गालबोट लावणारी आहे. नागपूरच्या हिंसाचाराला जबादार कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत. शंभरपेक्षा जास्त समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेच. पण राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या विरोधातील नेत्यांनी जी काही गेल्या काही दिवसांत प्रक्षोभक भाषणे झाली त्यातून हिंसाचाराचा उद्रेक झाला असे दिसून येते.

देशभर छावा चित्रपट अतिशय जोरात चालू आहे. छावा चित्रपट बघितल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांविषयी भक्ती, आदर व प्रेम प्रत्येकाच्या मनात उफाळून येत आहे. तसेच संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंजेबाविषयी संताप, द्वेष, मत्सर प्रत्येकाच्या मनात पेटून उठत आहे. देशावर सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास कधी जनतेपुढे मांडला नाही अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. आपल्या राजाचा क्रूर पद्धतीने छळ करणाऱ्या औरंजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? अशी भावना हिंदूंच्या मनात बळावू लागली, त्यातून संभाजीनगरपासून २५ किमी अंतरावर असलेली औरंजेबाची कबर हटवा अशी मागणी जोर धरू लागली. जनतेच्या भावनांचा विचार न करता औरंजेबाजाचे उत्तादीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाच्या विरोधकांनी विशेषत: महाआघाडीतील राजकीय पक्षांनी चालविल्यामुळे लोकांच्या मनात आणखी संताप निर्माण झाला.

त्यातूनच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातून औरंजेबाजाचे थडगे हटवा अशी मोहीम सुरू केली. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री हे नागपूरचे असताना नेमके नागपूरला औरंजेबाच्या थडग्यावरून हिंसाचार कसा झाला? नागपूरच्या दंगलीचे सूत्रधार कोण आहेत? नागपूरला दंगल घडविण्याचे कारस्थान कोणी रचले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच दंगल झाली म्हणून विरोधकांना सरकारवर टीका करायला आयते हत्यार मिळाले. पण या दंगलीला कारणीभूत विरोधी पक्षातील नेत्यांचीच बेताल वक्तव्ये आहेत याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. नागपूरच्या दंगलीचे पडसाद दुसऱ्या दिवशीच अपेक्षेप्रमाणेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पडले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विधानसभेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सरकारची भूमिका मांडताना विरोधकांच्या बेजाबदार वर्तवणुकीवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. औरंगजेब हा क्रूर नव्हता असे कोण म्हणाले होते? असे बेलगाम वक्तव्य केल्याने अबू आजमी यांना विधानसभेने अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबत केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर औरंजेबाची आणि देवेद्र फडणवीस यांची कारकीर्द एकसारखीच आहे असे वक्तव्य करून आपल्या अकलेचे दिवे पाजळले होते. उबाठा सेनेचे आमदार अनिल परब यांनी तर सभागृहातच आपला संभाजी महाराजांप्रमाणेच छळ झाला असे बालिश वक्तव्य केले होते. स्वत:ची संभाजी महाराजांशी तुलना करणे हे हास्यास्पद नव्हे तर निषेधार्ह आहे. या सर्वांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात साफ उघडे पाडले. अबू आजमी, हर्षवर्धन सपकाळ किंवा अनिल परब हे कसे ढोंगी आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकले. तुमचा काय छळ झाला होता, तुमच्यावर कारवाई झाल्यावर तुम्ही लोटांगण घातले होते, या प्रकरणातून सुटका झाल्यावर तुम्ही तुमच्या नेत्याप्रमाणे पलटी मारली, अशा शब्दांत एकनाथ शिंदेनी परबांना उघडे पाडले.

महाराष्ट्रातून औरंजेबाची कबर हटवा अशी मागणी राज्यात प्रत्येक शहरातून नि गावागावांतून होत आहे. नागपूरला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंग्याची प्रतिमा जाळली व आपला संताप प्रकट केला. त्यानंतर पोलिसांनी शांतता निर्माण केली होती. पण अचानक रात्री मुस्लिमांचा मोठा जमाव हातात लाठ्या, काठ्या, दगड, तलवारी घेऊन बाहेर येतो व तोडफोड व जाळपोळ करू लागतो हे सर्व धक्कादायक होते. ज्या ठिकाणी रोज शे-दीडशे वाहने पार्किंगमध्ये असतात, तेथे एकही वाहन त्यावेळी नसते हा काही योगायोग नव्हे. जमावाने गणवेषातील पोलिसांनाच आपल्या हल्ल्याचे लक्ष्य बनवले हे सर्वात गंभीर होते. किती पोलीस जखमी झाले, किती पोलिसांची डोकी फुटली, किती जणांचे हात-पाय मोडले याविषयी विरोधी पक्ष एक शब्दाने बोलायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल झाली यावरच विरोधी पक्ष थटथयाट करताना दिसला. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे कायदा-सुव्यवस्थेबाबत नेहमी दक्ष असतात. ज्यांनी पोलिसांवर हात उचलला त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार हे त्यांनी ठामपणे सांगितले. ज्यांच्यावर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी आहे, त्यांच्यावर ते कर्तव्य बजावत असताना पेट्रोल बॉम्ब आणि दगड फेकणे हे अतिशय गंभीर आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी जखमी पोलिसांशी व्हीडिओ फोनवरून संपर्क साधला, त्यांनी जो दंगलखोरांशी सामना केला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले, सरकार त्यांच्या पाठीशी आहे असे सांगून त्यांना नैतिक बळ दिले व लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. नागपूरच्या दंगलीचे भांडवल करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा महाआघाडीचा डाव चांगलाच फसला पण त्यांच्यावरच उलटला.

Recent Posts

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवणार

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७…

40 minutes ago

जागतिक ऑटिझम दिनाच्या निमित्ताने

मेघना साने दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम दिन होता. ऑटिझम म्हणजे नेमके काय याबद्दल मला कुतूहल…

58 minutes ago

Earth Day : जागतिक वसुंधरा दिवस

अंजली पोतदार आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून तिच्यावर अस्तित्वात असलेल्या…

1 hour ago

अग्निसुरक्षा एक सामाजिक जबाबदारी

सुरक्षा घोसाळकर आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी पूजा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळे अग्नीचे पावित्र्य…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १८ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग सिद्ध. चंद्र राशी…

1 hour ago

IPL Anniversary: १७ वर्षांची झाली आयपीएल लीग, पहिल्याच सामन्यात आले होते मॅकक्युलमचे वादळ

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात…

2 hours ago