जळगाव : लग्नसराईच्या हंगामातच सोने आणि चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. जळगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून, चांदीच्या किमतींनीही विक्रमी पातळी गाठली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर (विना जीएसटी) ८८,८०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला, तर जीएसटीसह हा दर ९१,४६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ होत १,०२,५०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकावर चांदी पोहोचली आहे.
केवळ गेल्या १८ दिवसांत सोन्याचा दर तब्बल ३३०० रुपयांनी, तर चांदीचा दर ६०००-६५०० रुपयांनी वाढला आहे. मध्य पूर्वेतील तणाव व जागतिक अस्थिरता – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढता तणाव आणि अमेरिका-चीन व्यापार धोरणांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे दरही वाढले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीत अधिक गुंतवणूक केली जात आहे. सोने आणि चांदीच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी लग्नसराईत दागिने खरेदी करणे कठीण झाले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली असून, अनेक ग्राहकांनी खरेदीला ब्रेक लावल्याचे सराफा व्यावसायिक सांगत आहेत. येत्या काळातही दर वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांसाठी मात्र हा चांगला काळ मानला जात आहे.