नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सचिव देवजित सईकिया यांच्या वक्तव्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआय च्या कठोर नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या नवीन नियमांनुसार विदेश दौऱ्यादरम्यान खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी दिला जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. यावर कोहलीने सडेतोड भूमिका मांडली. तो म्हणाला की, ‘हॉटेलच्या खोलीत एकटा उदास बसण्यापेक्षा मैदानावरच्या कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मी नेहमीच आपल्या कुटुंबीयांना सोबत ठेवणे पसंत करतो,’ असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. तथापि, बीसीसीआय ने बुधवारी स्पष्ट केले की, खेळाडूंसाठी लागू असलेले नियम तसेच कायम राहतील आणि त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच विराट कोहलीच्या नाराजी विधानानंतर बीसीसीआय सचिवांनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाची मानली जात आहे. कोहलीच्या नाराजीचा कसलाही परिणाम बीसीसीआयवर झालेला नाही. बीसीसीआय आपल्या धोरणावर ठाम राहणार आहे. बोर्डाचे सचिव सईकिया यांनी कोहलीच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, ‘बीसीसीआय खेळाडूंच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल करणार नाही. हे नियम संघाच्या व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या भल्यासाठी तयार करण्यात आले आहेत.’