
मुंबई : कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करणाऱ्या सहकारी सोसायटींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सदाशिव खोत यांनी अर्धातासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या सांगली जिल्ह्यातील सहकारी सोसायटीच्या गैरव्यवहाराच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री भोयर बोलत होते. सांगली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने दिलेल्या खावटी कर्ज प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल असे सांगून राज्यमंत्री भोयर म्हणाले की, एक हजार पेक्षा जास्तीचे कर्ज चेकने वितरीत करावयाचे असून ते रोखीने देता येत नाही. तसेच ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज वाटप करता येत नाही.अशा प्रकारे कर्ज वाटप करून त्याच्या वसुलीसाठी एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव करण्यात येत असेल तर अशा प्रकरणांमध्ये चौकशी करण्यात येईल. तसेच अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव करता येणार नाही किंवा जप्तही करता येणार नाही. चौकशी झाल्यानंतरच सबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत निर्णय घेतला जाईल असेही राज्यमंत्री भोयर यांनी सभागृहात सांगितले.