रत्नागिरी : राज्यात, जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. टाटा उद्योग समूह व एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरातील चंपक मैदान येथे टाटा संचलित काैशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, टाटा उद्योग समुहाचे कुणाल खेमनार, अनिल केलापुरे उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्याचे युग तंत्रज्ञानाचे युग असून, त्यामध्ये बदल होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:ला घडवताना तांत्रिक व व्यवसाय प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे. या संकल्पनेतूनच काैशल्यवर्धक केंद्राची रत्नागिरीत उभारणी केली जात आहे. चंद्रपूर, गडचिरोली व त्यानंतर रत्नागिरी शहरात हे केंद्र सुरू होणार आहे.
याचे श्रेय पालकमंत्री उदय सामंत यांना आहे. सध्या कुशल मनुष्यबळाची गरज असून, ही गरज काैशल्यवर्धन केंद्रामुळे पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास न होणारे प्रकल्प कोकणात उभे राहणार आहेत. कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असा कोणताही प्रकल्प कोकणात येणार नसल्याची ग्वाही पवार यांनी दिली आहे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, रत्नागिरी शहरात १९७ कोटींचे काैशल्यवर्धन केंद्र उभारत असून, लवकरात लवकर ते पूर्ण होईल.
या प्रकल्पामुळे शहर व आसपासच्या तालुक्यांत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना फायदा होणार आहे. अत्याधुनिक प्रशिक्षणामुळे राेजगार, नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.अभियांत्रिकी, रासायनिक, फळप्रक्रिया उद्योगांना मनुष्यबळाची उपलब्धता होईल, असेही ते म्हणाले. १९७ कोटी खर्च या कौशल्य केंद्रावर करण्यात येत आहे.त्यामध्ये १६५ कोटी टाटा उद्योग समूहाकडून मिळणार आहेत. जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. त्यामध्ये रत्नागिरीत रिलायन्सचा संरक्षण साहित्य विषयक प्रकल्प, रत्नागिरीत होणारे डोमेस्टिक विमानतळ तसेच क्रूज टर्मिनल लवकरच तयार होत आहे, असेही पवार यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत पाठपुरावा करून लवकर ताे पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तसेच विमान, जल, रस्ते विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, रत्नागिरीचे रूप बदलण्याचे काम उदय सामंत यांनी केले आहे. रत्नागिरीतून होणारी स्थलांतरे रोखण्याचे काम ते करत आहेत. अनेक प्रदूषण विरहित प्रकल्प रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरीत सुरू होणाऱ्या कौशल्य संवर्धन केंद्रात सात हजार विद्यार्थी दरवर्षी शिकणार आहेत. उद्योग मंत्री सामंत यांनी रत्नागिरी बरोबर रायगड जिल्ह्यात देखील विविध उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत असेही सांगितले. मंत्री सामंत म्हणाले की, काैशल्यवर्धन केंद्रामुळे रत्नागिरीतील विद्यार्थी रत्नागिरीतच शिकून रोजगार किंवा व्यावसायिक व्हावा, अशी अपेक्षा आहे. हे केंद्र वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी खुले करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.