नागपूर : नागपूरातील (Nagpur) शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल (दि १७) सायंकाळच्या सुमारास औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीसाठी दोन गटात झालेल्या आक्रमकतेमुळे नागपूर शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे. सोमवारी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच मुख्याध्यापकांनी स्थानिक स्थिती बघून निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मुस्लिम प्रतीकांचा अवमान केल्याचा आरोप करीत आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली. अफवा पसरल्यामुळे सायंकाळी महाल येथे तणाव वाढला. चिटणीस पार्कजवळ काही असामाजिक तत्त्वांद्वारे जोरदार दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यात पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले. जमाय पांगविण्यासाठी पोलिसांना अनुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रात्री धरपकड सुरू झाली. परिस्थितीची दखल घेत शाळा प्रशासनाने नागपूर (Nagpur) शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शाळांच्या ग्रुपवर सकाळी सुटीचे मेसेज टाकून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सूचना दिली आहे. मात्र शिक्षकांसाठी शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महाल परिसरातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.