मुंबई : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयाची औपचारिक घोषणा २० तारखेला अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच केली जाईल. ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणुकीसाठी महायुतीच्या पाच उमेदवारांच्या व्यतिरिक्त फक्त एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. छाननीवेळी नियमानुसार आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. आता निवडणूक रिंगणात पाच रिक्त जागांसाठीचे महायुतीच्या पाच उमेदवारांचे अर्जच शिल्लक आहेत. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारांच्या विजयाची औपचारिक घोषणा २० मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच केली जाईल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे पाच उमेदवार
- संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे – भाजपा
- चंद्रकांत रघुवंशी – शिवसेना
- संजय खोडके – राष्ट्रवादी काँग्रेस
संध्याकाळी ठरवून दंगल झाली ? एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला प्रश्न
राज्याच्या विधान परिषदेतील पाच आमदारांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर विधानसभेचे आमदार झालेल्या पाच जणांनी विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांसाठी निवडणूक होणार आहे. आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेचे आमदार झाले आहेत. या पाच जणांच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.
विधान परिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी १७ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार होते. अर्जांची छाननी १८ मार्च रोजी झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० मार्च पर्यंत असेल.