मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया त्यांच्या रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत येतात. जान्हवी आणि शिखर यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, शिवाय ते पापाराझींच्या कॅमेऱ्यातही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. जान्हवी सोशल मीडियावर विशेष सक्रिय असली तरी शिखरने त्याच्या इन्स्टाग्रामवर फार फोटो पोस्ट केलेले नाही. आता त्याने केलेली पोस्ट मात्र खूप चर्चेत आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाने सोशल मीडियावर एका युजरला चांगलंच सुनावलं आहे. संबंधित युजरने शिखरच्या एका फोटोवर जातीवाचक टिप्पणी केली होती. त्याने जातीवरून लक्ष्य करणाऱ्या एका ट्रोलरला फटकारले. गेल्यावर्षीच्या दिवाळीत शिखरने शेअर केलेल्या फोटोवर आलेल्या एका कमेंटवर शिखरने सडेतोड उत्तर दिले आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शिखरने लिहिलं, ‘२०२५ मध्येही तुझ्यासारखे इतक्या लहान, मागासलेल्या विचारसरणीचे लोक आहेत, हे खरंच दुर्दैवी आहे. दिवाळी हा प्रकाश, प्रगती आणि एकता-संकल्पनांचा उत्सव आहे, जो तुझ्या मर्यादित बुद्धीच्या पलीकडचा आहे. भारताची ताकद नेहमीच त्याच्या विविधतेत आणि सर्वसमावेशकतेत राहिली आहे, जे अर्थातच तुला समजलं नाहीये. अशा पद्धतीचं अज्ञान पसरवण्याऐवजी तू स्वत:ला शिक्षित करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. कारण सध्या इथं खरोखरं अस्पृश्य असलेली एकमेव गोष्ट म्हणजे तुझ्या विचारसरणीची पातळी आहे.’
View this post on Instagram
शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याची आई स्मृती शिंदे या अभिनेत्री आहेत. तर मोठा भाऊ वीर पहाडियाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. अक्षय कुमारच्या ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून त्याने अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं. यामध्ये त्याने अक्षय कुमार, सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्यासोबत भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिखर आणि जान्हवी एकमेकांना डेट करत आहेत.