मराठवाड्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे भूजल पातळीत देखील दिवसेंदिवस घट होत आहे. उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विहिरी उष्णतेमुळे आटू लागल्या आहेत. सर्वत्र कडक उन्हाळा सुरू झाला असून त्याच्या झळा मराठवाड्यातील नागरिकांना बसत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराला १५ दिवसांसाठी जेवढे पाणी लागते, तेवढे पाणी कडक उन्हामुळे एकाच दिवसात बाष्पीभवन होऊन त्याची वाफ होत आहे. या कडक उन्हामुळे बाष्पीभवन होऊन किती पाणी आपल्या हातातून जात आहे, याचा अंदाज येऊ शकतो. जायकवाडी धरणातून दररोज १.८० द.ल.घ.मी पाण्याची वाफ होत आहे. बाष्पीभवनाचे प्रमाण आणखी वाढणार आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे उपयुक्त पाणीसाठा चांगल्या प्रमाणात जमा झाला. यंदाच्या मार्च महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट उपयुक्त पाणीसाठा जायकवाडी धरणात जमा आहे. मागील वर्षी जायकवाडी धरणात मार्च महिन्यात २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा हा पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा अधिक शिल्लक आहे. असे असले तरी पाण्याचा वापर करत असताना काळजीपूर्वक पाणी वापरावे लागणार आहे. मराठवाड्यात विंधन विहिरीतून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे.
त्यामुळे मराठवाड्यात भूजल पातळी यंदाच्या मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात खोल गेली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून घेण्यात आलेल्या निरीक्षण नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयाअंतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत विहिरीतील भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यामध्ये सर्वात कमी भूजल पातळी परभणी जिल्ह्यात आढळून आली. मराठवाड्यात २०२४ च्या जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भात पाणी मुरण्याच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली होती. तसे पाहिले तर मराठवाड्यात पूर्वीपासूनच पाण्याची कमतरता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर या भागांत दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खूप खाली जाते. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगेाली तसेच जालना जिल्ह्यात तीन दिवस, कधी कधी चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. नांदेड जिल्ह्यातही पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे. गोदावरी नदीचे नाभीस्थान नांदेडमध्ये आहे. गोदावरी नदीवर विष्णुपुरी धरण असले तरी, ते पाणी सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात साठवणूक करण्यासारखे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत एप्रिल व मे महिन्यात चांगलीच पाणीटंचाई जाणवते.
पाण्याचे महत्त्व सर्वांनाच आहे; परंतु तरीही पाण्याचा वापर करत असताना जी काळजी घेतली जावी, तशी काळजी घेताना दिसत नाही. मराठवाड्यातील धरणनिहाय पाण्याचा साठा हळूहळू कमी होत आहे. जलसाठ्यात मार्च महिन्यातील उष्णतेमुळे ९ टक्के घट झाल्याचे सांगण्यात आले. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली आहे. त्याशिवाय बाष्पीभवनालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरणे अतिशय आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीत येलदरी धरणात सर्वाधिक ६२४.७६ उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्या पाठोपाठ माजलगाव धरणात १३६.७० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सर्वात कमी शिवणी धरणात ४.७६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणाची स्थितीही म्हणावी तेवढी चांगली नाही. या धरणात ३१.७२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पावसाळा येईपर्यंत हे पाणी नांदेडकरांना पुरणार नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक लघू प्रकल्प मराठवाड्यात आहेत. ६९५ लघू प्रकल्पांमध्ये एकूण ८९७.५० द.ल.घ.मी पैकी ५९९.३३ द.ल.घ.मी उपयुक्त साठा आहे.
मराठवाड्यात सर्वांत जास्त लघू प्रकल्प असतानाही उपयुक्त साठ्याच्या टक्केवारीची सरासरी सर्वांत कमी आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर जलसंकट उद्भवले आहे. येत्या २ ते ३ महिन्यांत अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. पाण्याचा वापर करत असताना सर्वांनाच काळजी घेणे, अत्यंत गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत म्हणजेच होळीनंतर तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यानंतर पाण्याचा वापर व मागणीही सर्वत्र वाढणार आहे. तुम्ही, आम्ही सर्वांनी पाण्याचे महत्त्व समजून घेऊन जास्तीत जास्त पाण्याची बचत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. विशेष म्हणजे प्रत्येकाने आपापल्या घरातील स्वयंपाकगृह, शौचालय, स्नानगृह येथील नळाची तुटी व्यवस्थित नसेल तर ती दुरुस्त करून घ्यावी. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण लक्षात घेऊन पाण्याचा एक-एक थेंब वाचविला तर जलसंपत्तीत नक्कीच वाढ होईल. केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व नागरिकांनी पाण्याची बचत कशी करता येईल याकडेच लक्ष देणे अत्यंत आवश्यक वाटते.
सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे मराठवाड्यातील सर्वच शाळा दुपारच्या सत्रात भरविण्याऐवजी सकाळच्या सत्रात भरविल्या जाव्यात, अशी मागणी पालक वर्गातून पुढे येत आहे. उन्हाळा तीव्र असल्यामुळे दुपारच्या वेळेत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन मराठवाड्यात किमान एकाच सत्रात शाळा चालविल्या जाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत…
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…
रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…
मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…
मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…