पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांना पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत गुजरात दंगलीबद्दलचे वास्तव उघड केले आणि काँग्रेसने गुजरात दंगलीबद्दल कसे खोटे नरेटिव्ह वर्षानुवर्षे सेट केले होते ते उघड केले. आजही मोदी यांना काँग्रेस या गुजरात दंगलीबद्दल टार्गेट करत आहे आणि आपले संपत आलेले राजकारण या मुद्द्यावर चालवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी हेही या फेक नरेटिव्हचा वापर करून मोदी यांना टार्गेट करत असतात पण येथील जनता सूज्ञ असल्याने मोदी यांच्यासमोर राहुल यांची डाळ शिजत नाही आणि काँग्रेसला मुँह की खावी लागते. पण काँग्रेस आपली सवय सोडत नाही याची खंत यातून व्यक्त होते. मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये गुजरात दंगलीपासून ते अनेक विषयांवर आपली मते मांडली आहेत आणि त्यात चीन आणि पाकिस्तान यांच्याशी संबंध, अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेले मोदी यांचे संबंध, एआय आणि प्रार्थना, स्वतःची गरिबी अशा अनेक विषयांचा समावेश या पॉडकास्टमध्ये आहे. गोध्रा दंगलीबाबत मोदी यांनी जे भाष्य केले आहे ते सर्वांत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच आजही विरोधक त्यांना टार्गेट करत असतात. वास्तविक गुजरात दंगली या विरोधकांनी सांगितल्या तेवढ्या मोठ्या नव्हत्या. म्हणजे मनुष्यहानी झाली हे वाईटच झाले. पण काँग्रेसने या दंगलींचा वापर मोदी यांच्याविरोधात केला तो खुनशीपणाने. पण त्यानंतर मात्र मोदी यांनी झेप घेतली आणि आज मोदी देशाचे तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत. राहुल गांधी एकदाही पंतप्रधान होऊ शकलेले नाहीत. गोध्रा दंगल ही अकल्पनीय प्रमाणातील मानवी शोकांतिका होती असे मोदी म्हणाले. त्या भारतातील सर्वांत मोठ्या दंगली आहेत हा जो काँग्रेसने अपप्रचार चालवला होता तो मात्र खोटा होता असे मोदी सांगतात. हा प्रकार काँग्रेसच्या चुकीच्या माहिती प्रसारातून आला असे मोदी म्हणतात ते काही खोटे नाही.
मोदी यांच्या म्हणण्यानुसार, गुजरात दंगलीच्या आधीही कित्येक मोठ्या स्वरूपाच्या दंगली भारतात आणि खुद्द गुजरातमध्येही झाल्या होत्या. अगदी पतंग उडवण्यावरून झालेल्या दंगलीवरून ते कित्येक लहान-मोठ्या प्रसंगावरून दंगली झाल्या. पण त्या दंगली सर्वांत मोठ्या होत्या ही मात्र काँग्रेसने पसरवलेली खोटी कहाणी होती. याच दंगलीच्या काळात सोनिया गांधी यांनी मोदी यांना मौत का सौदागर असे विशेषण बहाल केले होते आणि त्याचा इतका वाईट परिणाम तत्कालीन विरोधकांवर झाला की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदी यांना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. पण काँग्रेसचा हा खोटारडेपणा जनतेनेच उघड पाडला आणि मोदी २०१४ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आले आणि पंतप्रधानही झाले. त्यानंतर त्यांनी आजतागायत मागे वळून पाहिले नाही. पण काँग्रेसचा फेक नरेटिव्हची किंमत देशाला आणि मोदी यांना मोजावी लागली काही काळ तरी. काँग्रेसने शीख हत्याकांडात कितीतरी राक्षसी भूमिका बजावली आणि कित्येक शिखांचे हत्याकांड केले. पण सोनिया किंवा राजीव गांधी यांना कुणी मौत का सौदागर म्हटले नाही. काँग्रेसचा फेक नरेटिव्हचा हल्ला उघड करताना मोदी यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. त्यात आहे ती त्यांची सुरुवातीची गरिबी. मोदी म्हणाले की, सुरुवातीला आम्ही अत्यंत गरीब होतो. त्याशिवाय भारताची सांस्कृतिक परंपरा आणि जडणघडण. पाकिस्तानशी असलेले संबंध आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध यावरही मोदी यांनी भाष्य केले आहे. सर्वांत महत्त्वाचे आहे ते म्हणजे गुजरात दंगली ज्या मुद्द्यावरून आजही विरोधक त्यांचा छळ करतात आणि त्यांना टार्गेट करत असतात. मोदी म्हणाले की, अजूनही २००२ च्या दंगलीभोवती खोटी कहाणी रचली जात असते आणि त्याचे टार्गेट मोदी किंवा भाजपाला करण्याचा प्रयत्न होतो. २००२ पूर्वी गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या आणि जातीय हिंसाचार वारंवार सुरूच होता. देशात दहशतवादी हल्ले आणि जातीय तणाव शिगेला पोहोचला होता. हे वास्तव मोदी यांनी सांगितले आणि त्यामुळे आजच्या पिढीला नवीन माहिती कळली. नाही तर ती त्याच काँग्रेसी विचारवंतांच्या प्रभावाखाली राहिली असती. देशात तेव्हा अस्थिरतेचे वातावरण होते आणि जगातही दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यात कंधारचे विमान अपहरण प्रकरण, लाल किल्ल्यावर हल्ला आणि अफझल गुरूने संसदेवर केलेला हल्ला या प्रकरणांचा उल्लेख मोदी यांनी केला. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते पण तेव्हा कुणीही काँग्रेसला या दहशतवादी कृत्यांबद्दल जबाबदार ठरवले नाही. मोदी यांची कैफियत ही सच्चा दिलाची आहे आणि त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गुजरात दंगलीनंतर राज्यात एकही मोठी दंगल घडलेली नाही असे मोदी यांनी म्हटले तेव्हा त्याला फार मोठा अर्थ आहे. कारण काँग्रेसचे फेक नरेटिव्ह तेव्हा अपयशी ठरत होते आणि काँग्रेस या आपल्या फेक नरेटिव्हच्या जोरावर फार काळ राज्य करू शकणार नाही हे स्पष्ट झाले होते. मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने स्थिरता आणण्याचे प्रयत्न केले पण माध्यमांच्या विशिष्ट गटांनी आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. आजही ते प्रकार सुरूच आहेत. खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न केला गेला पण शेवटी न्यायाचा विजय झाला. यातच मोदी यांचा गुजरात दंगलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. टीका लोकशाहीचा आत्मा आहे असे मोदी म्हणतात, तेव्हा ते इतके सर्व असूनही विरोधकांप्रति किती सहनशील आहेत हे सिद्ध होते.
टीका ही विश्लेषणावर आधारित असावी पण आजकाल अशी टीका केली जात नाही यावर मोदी यांनी केलेले भाष्य आजच्या सर्वच राजकारण्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. तेव्हाच्या राजकारणावरही मोदी यांनी भाष्य केले आहे. काही दशकांपासून मतांसाठी काही गटांना खूश करण्याचा प्रयत्न केला जातो आणि असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. पण मोदी सरकारने हे बदलले आणि तेव्हापासून राजकारण बदलले आणि काँग्रेस देशातून संपण्याच्या मार्गावर आहे. मोदी यांच्या या पॉडकास्टने विरोधकांचा पर्दाफाश केला आहेच पण खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसचा बुरखा टराटरा फाडला आहे.