Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखकोकणातल्या वाघाची विधानसभेतील डरकाळी...!

कोकणातल्या वाघाची विधानसभेतील डरकाळी…!

सुनील जावडेकर

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ आमदार राज्यभरातून निवडून येतात. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच या २८८ पैकी ७८ आमदार हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहे. त्यातीलच एक आहेत आमदार डॉक्टर निलेश निलम नारायण राणे. कोकणातील खर्डा आवाज, आजूबाजूच्या घडामोडींवर घारीसारखी चौफेर बारीक भेदक नजर, माजी संसद सदस्य असल्याने संसदीय कार्यपद्धतीची पुरेपूर माहिती, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोकशाहीतील आयुधांचा अत्यंत प्रभावी वापर, कोकणातील प्रश्नांची तपशीलवार माहिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्न मुद्देसूद, अभ्यासपणाने मांडून ते तातडीने कसे सुटतील याची अंगी असलेली हातोटी यामुळे निलेश राणे विधानसभेत बोलायला उभे राहिले की, सर्व आमदारांपासून ते मंत्री आणि प्रेस गॅलरीपर्यंत साऱ्यांचे कान आपसूकच टवकारले जातात.
निलेश राणे हे बोलण्यात अत्यंत हुशार आणि प्रभावी आहेत. राज्यातील जनतेच्या प्रश्नांबाबत ते सदैव जागृत असतातच, मात्र त्यातही कोकणातील रत्नागिरी जिल्हा आणि विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हा हा निलेश राणे यांच्या सभागृहातील आजवरच्या बोलण्याचा प्रमुख आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. कोकणातील भोळ्याभाबड्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांना दैनंदिन आयुष्यात सरकारी अनास्थेमुळे अथवा सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षाने भोगावे लागणारे त्रास भेडसावणाऱ्या समस्या या निलेश राणे यांच्या भाषणात प्रमुख केंद्रस्थानी असतात.

निलेश राणे एकदा का बोलायला उभे राहिले की, ते जनतेच्या प्रश्नांशी पूर्णपणे एकरूप झालेले असतात. आणि मग सत्तेवर कोण आहे आणि विरोधक कोण आहे हे देखील ते पाहत नाही. त्या वेळेला त्यांचा प्रमुख हेतू त्यांनी मांडलेली समस्या तत्काळ सुटणे हाच असतो. त्यामुळे त्यांची सभागृहातील भाषणे ही सत्ताधारी पक्षाला टार्गेट करणारी असतात असा एक मोठा गैरसमज आहे, वास्तविक निलेश राणे हे वारंवार त्यांच्या भाषणातून हे सांगत असतात की, मी सरकारवर टीका करत नाही, सरकारी यंत्रणांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजातील त्रुटी, त्यांनी केलेल्या चुका या सभागृहाच्या माध्यमातून सरकारला निदर्शनास आणून देणे म्हणजे सरकारवर टीका करणे नव्हे. कोकणातील पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या समस्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य वारसा सांगणारे कोकणातील पुरातन आणि ऐतिहासिक गडकिल्ले, निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे होणारे नुकसान आणि या सर्व मूलभूत समस्यांकडे सरकारच्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे दुर्लक्ष हे निलेश राणे यांच्या सभागृहातील भाषणाचा विषय असतात.

कोकणला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण निळा क्षार स्वच्छ समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर रायगड, पालघर येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र आता त्यामध्ये परप्रांतीयांनी यांत्रिक पद्धतीने पर्सिलीनचा वापर करत मच्छीमार करणाऱ्यांनी घुसखोरी केल्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे असो की आमदार निलेश राणे असो कोकणातील पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेसाठी रोजगारासाठी आणि त्याचबरोबर व्यवसाय वाढीसाठी हे दोघेही बंधू जिवापाड प्रयत्न करत असतात. नितेश राणे हे तर आता याच खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांचा सर्वाधिक प्रयत्न पारंपरिक मच्छीमार बांधवांना दिलासा देण्याकडे असतो. तर आमदार निलेश राणे हे सभागृहाच्या माध्यमातून पारंपरिक मच्छीमार बांधवांचे प्रश्न सरकार दरबारी अत्यंत आक्रमकपणे आणि मुद्देसूद पद्धतीने मांडत असतात आणि सभागृहात मांडलेल्या प्रश्नांवर सभागृहातच उत्तर मिळवून घेऊन प्रश्न सोडवण्यावर निलेश राणे यांचा प्रमुख भर असतो. पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांबरोबरच राज्यात तसेच कोकणातही मोठ्या प्रमाणावर होत असलेली बेकायदेशीर गोमांस विक्री ही निलेश राणे यांच्या संतापात भर घालत असते. महाराष्ट्राने जरी गोहत्या व गोवंश हत्या ही कायद्याने बंदी केली असली तरी देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या उघडपणे कत्तल खान्यांमध्ये गोहत्या व गोवंश हत्या केल्या जात आहेत आणि या संदर्भातला अपराध हा जामीनपात्र अपराध असल्यामुळे हे करणारे उघडपणे उजळ माथ्याने पुन्हा पुन्हा हेच दुष्कृत्य करत आहेत. याबाबत आपल्या ठेवणीतल्या राणे स्टाईलने ते झोड उठवतात. गोहत्या व गोवंश हत्या हे गुन्हे राज्य सरकारने तातडीने अजामीनपात्र करावेत अशी आग्रही मागणी ते सातत्याने विधिमंडळ अधिवेशनात करत आहेत. तसेच गोमांस विक्रीमध्ये जे लोक उघडपणे हे रॅकेट चालवत आहेत त्यांचे उद्योग उद्ध्वस्त करण्याबाबतही ते सातत्याने सरकारकडे मागणी करत आहेत. गोहत्या आणि वंश हत्यांवरून कट्टर विरोधकही जेवढे सरकारवर तुटून पडणार नाहीत त्यापेक्षा अधिक त्वेषाने निलेश राणे हे सरकारी यंत्रणांवर अक्षरशः आसूड ओढतात.
याबरोबरच कोकणातील शिवकालीन ऐतिहासिक, पुरातन असे गडकिल्ले त्यांची देखभाल त्यांचे सौंदर्य, त्यांची निगराणी आणि याकडे केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे त्याचबरोबर राज्य सरकारचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यावरूनही निलेश राणे हे सातत्याने आक्रमक भूमिका मांडत असतात. मालवण विधानसभा मतदारसंघाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि त्याचबरोबर रत्नागिरी सह रायगड, कोकण या प्रांताचा चौफेर विकास व्हावा यासाठी निलेश राणे हे अर्थसंकल्पावरील चर्चेत किंवा पुरवणी मागण्यांवरील चर्चा अधिकाधिक निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला कसा मिळेल, कणकवली मतदारसंघात कसा उपलब्ध होऊ शकेल तसेच रत्नागिरी व कोकणसाठी देखील अर्थसंकल्पात अधिकाधिक निधी कोणत्या मार्गाने मिळवता येऊ शकेल यासाठी निलेश राणे हे सभागृहात कोकणसाठी निर्भीडपणे आणि बेधडकपणे परखडपणे आपली मते मांडत असतात. कोकणी जनतेला भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या या त्यांच्या भाषणाचा मुख्य गाभा असतो. मग पावसामुळे पूर येऊन ग्रामस्थांचे होणारे नुकसान असो की कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषदांना केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा विकासकामांसाठीचा तुटपुंजा निधी असो यावर ते अत्यंत आक्रमकपणे कोकणची आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याची रास्त भूमिका सडेतोडपणे सरकार समोर मांडत असतात.

वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्याकडून मिळालेले बाळकडू आमदार निलेश राणे यांनी उत्तमरीत्या आत्मसात केले आहे. कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची असलेली कमालीची बांधिलकी, समस्या सोडवण्यासाठी करावे लागणारे प्रामाणिक कष्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा का लोकांची समस्या त्यांनी हातात घेतली की ती पूर्णपणे सुटेपर्यंत त्या समस्येच्या जो आड येईल त्याला लोकशाही पद्धतीने आडवा करून लोकांना न्याय मिळवून देईपर्यंत आमदार निलेश राणे हे स्वस्थ बसत नाहीत. काम करण्याची पद्धत त्यांची निश्चितच वेगळ्या धाटणीची आहे मात्र तरीही ती जनतेच्या थेट हृदयाला भिडणारी आहे. त्यामुळेच अशा या आदर्श, लढवय्या, आक्रमक, अभ्यासू, चिकित्सक, परखड नेतृत्वाला जन्मदिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -