Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीशरद पवार यांच्या कुटुंबियांवर शोककळा, भावजय भारती पवार यांचे दीर्घ आजाराने निधन

शरद पवार यांच्या कुटुंबियांवर शोककळा, भावजय भारती पवार यांचे दीर्घ आजाराने निधन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भावजय भारती प्रतापराव पवार यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल, मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (१८ मार्च) दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत्या. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर २२ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत.

औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत असतं. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.

शरद पवार हे राज्यासह देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असले, तरी त्यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार हे राजकारणापासून दूर आहेत. प्रतापराव पवार हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांना २०१४ मध्ये पद्मश्री, तसेच २०१५ मध्ये पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रतापराव पवार यांना उद्योग क्षेत्रासह प्रत्येक कामात पत्नी भारती पवार यांची मोलाची साथ लाभली आहे.

सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शोक व्यक्त करताना म्हटले की, अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खूप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली.

खासदार सुनेत्रा पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे. भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या आम्हा सर्वांना आईसमान होत्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे. त्यांनी सर्व पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -