Friday, April 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजऔरंगजेबाची कबर हटवण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी महाराष्ट्रात आंदोलनाचा भडका

छत्रपती संभाजीनगर/पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप, बजरंग दलाने शिवजयंतीला हाती घेतली. औरंगजेबाची कबर न हटवल्यास ‘बाबरी’ची पुनरावृत्ती करण्याचा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, खुलताबाद येथील कबर परिसरात पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणात वाढवून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे यांनी पुण्यात संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले, की औरंगजेबाची कबर गुलामगिरी, लाचारी व अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी; अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरत आंदोलन करेल, मोर्चे काढेल व आवश्यकता भासल्यास चक्काजाम व कारसेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल.

आंदोलन करण्यात येणार आहे. तिथीप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सोमवारी स. ११:३० वाजता पुण्यासह राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर कबर हटवण्यासाठी आंदोलन झाले.

बजरंग दलाचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन औरंगजेबाची कबर शासनाने खणून काढावी, आलमगीर हे नाव कोठेही असू नये, अन्यथा बजरंग दलाचे लाखो कार्यकर्ते संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करतील,असा इशारा त्यांनी दिला.

औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये राडा, नेत्यांचे शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीसाठी नागपूरमध्ये चिटणीस पार्क आणि महाल भागात दोन गटात हाणामारी झाली. दगडफेक आणि जाळपोळ झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी हजर झाला. जमावावर लाठीमार करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

आधी औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद पेटला. नंतर अफवा पसरल्या. टायर जाळण्यात आले. दगडफेक झाली. काचा फोडण्यात आल्या. यातून तणाव वाढला. काही जणांनी वाहनांची तोडफोड केली. तसेच ई रिक्षा आणि ऑटो उलटवून रस्त्यावर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच जमावावर लाठीमार करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन आग विझवण्याचे प्रयत्न केले. यावेळी काही जणांनी आग विझवणाऱ्यांच्या दिशेने दगड फेकले. पण पोलिसांनी या परिस्थितीतही टिकाव धरुन हिंसा करणाऱ्यांना पिटाळून लावले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमधील घडामोडींसाठी राज्य शासनच जबाबदार आहे, या शब्दात सरकारवर टीका केली.

पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागाचेही कर्मचारी तैनात

विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी औरंगजेब कबर परिसराची पाहणी करून बंदोबस्त तैनात केला आहे. मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. औरंगजेबाची ही कबर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागानेही कर्मचारी तैनात केले आहे. एसआरपीएफचे ११५ शस्त्रधारी जवान, दंगल नियंत्रण पथकाच्या २५ पोलिस जवानांसह ६० पोलिस अंमलदार नियुक्त केले आहेत. कबर परिसरात जाताना २ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे. कबरीकडे जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे.संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेशबंदीचे आदेश जारी झाले आहेत.

दुदैवाने कबरीचे संरक्षण करावे लागते : देवेंद्र फडणवीस

औरंगजेबाचं महिमामंडण कधीच होणार नाही, दुदैवाने कबरीचे संरक्षण करावे लागते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचे संरक्षण आहे.केंद्राने संरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रालाही संरक्षण देणे भाग आहे. खरं म्हणजे, त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रात कशाला हवी? परंतु आपल्याला देखील कल्पना आहे. एएसआयने त्याला ५० वर्षापूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर येवून पडलेली आहे, असे फडणवीस म्हणाले.

औरंगजेबाची निशाणी महाराष्ट्रात कशाला? : एकनाथ शिंदे

“औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता. त्याने माता-भगिनींवर अत्याचार केले,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला,अशा औरंगजेबाची निशाणी महाराष्ट्रात पाहिजेच कशाला? अशी शिवभक्तांची भावना आहे, हीच भावना माझी देखील आहे. शिवभक्तांच्या भावनांचा आदर करायला हवा. औरंगजेबाचं समर्थन कोणीही करता कामा नये.” तसंच औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -