श्रीवर्धन : ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या निसर्गप्रेमी व वन विभागाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीत सुरू झालेल्या चळवळीला यंदा तब्बल बावीस वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या हंगामातील पहिली ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची ८९ पिले शनिवार व रविवार श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील सागरात झेपावली. संवर्धन केलेल्या अंड्यांतून जन्माला येणारी कासवाची पिल्ले टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती श्रीवर्धन कांदळवन कक्षाकडून देण्यात आली.
Shivsena : विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! ‘या’ नेत्याला मिळणार संधी
हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर २० वर्षांपासून ही सागरी कासवांचे संवर्धन करण्याची मोहीम वन विभाग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांच्या सहयोगातून राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर किंवा मार्च, एप्रिलदरम्यान कासव अंडी देण्यासाठी येतात. अंडी दिल्यावर मादी समुद्रात निघून जाते. ज्या ठिकाणी मादी अंडी देते त्या जागेला कासवाचे ‘घरटे’ असे म्हटले जाते. ही घरटी संरक्षित करण्याचे काम बावीस वर्षांपासून श्रीवर्धन तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर सुरू आहे.
पूर्वी मादी कासव साधारण २०० ते २५० अंडी द्यायची; परंतु वातावरणातील बदलामुळे हे प्रमाण १०० ते १५० पर्यंत आले आहे. ही अंडी विशिष्ट पद्धतीने वाळूत खड्डा करून ठेवली जातात. साधारणपणे ४५ ते ६५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर यायला लागतात. अंड्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या पिल्लांना साधारण तीस मिनिटांत समुद्रात सोडावे लागते. भरतीमुळे कासवांच्या घरट्यांना धोका उद्भवतो, त्यामुळे कासवमित्रांकडून ही अंडी सुरक्षित ठेवली जातात.