संतोष वायंगणकर
कुडाळ-मालवणच्या जनतेचे आणि सर्वच नेते कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आजचा इमोशनल क्षण आहे. १० वर्षांनंतर विजय मिळाला आहे. मी कोणाला हरवण्यासाठी ही निवडणूक लढविली नव्हती, तर माझ्याकडून या मतदारसंघात चांगले काही घडावे यासाठीच मी निवडणूक लढवली. मी कोणाला कमी लेखत नाही. या निवडणुकीतील माझे प्रतिस्पर्धी उबाठाचे उमेदवार वैभव नाईक यांनी अतिशय चांगली फाईट दिली आहे. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो अशी पहिलीच प्रतिक्रिया कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी माध्यमांसमोर दिली आणि राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या याचे कारणही तसेच होते. आ. निलेश राणे शिवसेनेवर टीका करणार असे अनेकांना वाटत होते; परंतु त्यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेनंतर त्याच ठिकाणी एक पत्रकार सहज बोलून गेला आ. निलेश राणे आज खऱ्या अर्थाने दोनदा जिंकले. या संयमीत प्रतिक्रियेने लोकांची मने त्यांनी जिंकली आणि प्रत्येक ठिकाणी राजकीय चष्म्यातून पाहायचे नसते. हे देखील त्यांनी दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणूक काळातही अतिशय संयमी, अभ्यासू भाषणांचा चांगला परिणाम निवडणुकीवरही झालेला दिसून येईल. अशा एका दिलदार, अभ्यासू आणि आदरभाव व्यक्त करत टीका करण्यापेक्षा आपल्या कामाला महत्त्व देणाऱ्या आमदार निलेश नारायण राणे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने आ. निलेश राणे यांना शुभेच्छा व्यक्त करतो.
२००९ साली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. अवघ्या २७ व्या वर्षी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून बसण्याची संधी आ. निलेश राणे यांना लाभली. काँग्रेसी सत्ताकाळातील खासदार झालेल्या निलेश राणे यांनी सभागृहात काय बोलावे, कसे बोलावे, शब्द कसे वापरावेत, अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह कशारितीने प्रभावित होते या सर्वांचा अत्यंत बारकाईने अभ्यास निलेश राणे यांनी केला. खा. नारायण राणे यांच्या रूपाने घरातच राजकारणाचा वस्तूपाठ समोर असल्याने त्यांच व्यक्तिमत्त्व घडत गेले; परंतु दोन वेळची मोदीलाट या लाटेत निलेश राणे यांना पराभव पत्करावा लागला. दोनवेळच्या पराभवानेही आ. निलेश राणे यांनी आपले काम थांबवले नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात पक्षियस्तरावर व सामाजिक कामात ते सतत राहिले. मागील पाच वर्षांपूर्वी त्यांनी मनोमन ठरवले की, कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवायची… आणि ते कामाला लागले. कुडाळ, मालवण तालुक्यात जनसंपर्क वाढविली. गावो-गावी लोकांना भेटत राहिले. मात्र, आ. निलेश राणे यांच्या विरोधकांनी नेहमीप्रमाणे अपप्रचाराच्या ‘पुड्या’ सोडल्या. जेणेकरून आ. निलेश राणे रिअॅक्ट होतील; परंतु तसे काही घडलेच नाही. विरोधकांना हवे ते आपण करायचे नाही. वागायचे नाही. हे अगोदरच निलेश राणे यांनी ठरवले आणि त्यांनी बदलही घडवला. राजकीय पुढारी सर्वसामान्य जनता यांच्या मनात निर्माण केल्या जाणाऱ्या शंका-कुशंका आणि प्रश्न या सर्वाला निलेश राणे यांनी त्यांच्यातील उपजत असलेल्या चांगुलपणाच्या स्वभावानेच उत्तर दिले. लोकांनाही कळून चुकले. निलेश राणे एकदम भारी माणूस आहे. अनेकवेळा गोबेल्स नितीचा वापर करून चर्चा घडवायची आणि बदनामीचे षडयंत्र तयार करायचे; परंतु हे असले असत्यावर आधारित फार काळ लोक स्वीकारत नाहीत. जेव्हा लोकांना चांगल-वाईट समजतं तेव्हा त्यांना माणूसपण कोणाकडे आहे हे देखील समजून चुकतं. कधी-कधी अवती-भोवती असणाऱ्या लोकांवरून किंवा सोबत असलेल्या आणि चुकीच वागणाऱ्यांचाही परिणाम त्या नेत्याला सहन करावा लागतो.
आ. निलेश राणे लोकांना थेटच भेटत असल्याने जनतेशी ते एकदम कनेक्ट झाले. सर्वसामान्य जनता त्यांच्याशी थेट संवाद साधू शकतो. हा जनतेच्या मनात त्यांनी विश्वास निर्माण केला. आ. निलेश राणे हे कोणताही गाजावाजा न करता सामाजिक बांधिलकीने काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. आरोग्याच्या बाबतीत तर ते फारच संवेदनशील आहेत. अनेक गोरगरिबांना मुंबईतील रुग्णालयातून त्यांनी उपचार करविले आहेत. आ. निलेश राणे हे आमदार म्हणून किती प्रभावित आहेत हे त्यांनी नागपूर अधिवेशनात किंवा सध्या मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशानातील अभ्यासू सहभागाने दाखवून दिले आहे. मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना ज्या अभ्यासूपणे आ. निलेश राणे यांनी मांडणी केली त्या अभ्यासू मांडणीमुळे सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आ. निलेश राणे ग्रेटच आहेत. सहज येणाऱ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. आ. निलेश राणे हे अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक आहेत. त्यामुळे ते त्याविषयावर अग्रहक्काने बोलू शकतात. आ. निलेश राणे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्यातला अर्थशास्त्रातला अभ्यासू विद्यार्थी त्यांनी कायम जागा ठेवला आहे. त्यामुळेच जेव्हा-जेव्हा अर्थशास्त्राचा विषय कुठे येतो तेव्हा त्यांनी केलेली मांडणी अधिक आखीव-रेखीव आणि तितकीच प्रभावी देखील असते. एक आमदार म्हणून विकासाच्याबाबतीत एक सतर्क आमदार म्हणून ते कार्यरत असतात. आ. निलेश राणे यांच विकासाच्याबाबतीत स्वत:च एक व्हीजन आहे. त्यामुळेच मालवण, कुडाळ शहरांचा विकास कशाप्रकारे करायला हवा. शहरात येण्यासाठी आणखी मार्ग तयार करण्याची आवश्यकता आणि पर्यटन दृष्टीने कसा विकास करता येईल याचे नियोजन आ. निलेश राणे यांच्याकडे आहे. राणे है तो मुमकीन नहीं. अशा या सहृदयी, मनाने दिलदार असलेल्या आ. निलेश राणे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…