मुंबई : अंधेरी येथील बहुचर्चित गोखले रोड पुलाचे बांधकाम आता युद्धपातळीवर सुरू असून येत्या मे महिन्याच्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाणार आहे. पुलाच्या पूर्व बाजूचे काम शिल्लक असून हे काम पूर्ण केले जात आहे. हे काम मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर पुढील आठवड्यातच हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती पूल विभागाकडून देण्यात आली आहे. सी. डी. बर्फीवाला रोड आणि एन. एस. फडके रोड यांना जोडणारा अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी महापालिकेने या कामासाठी डिसेंबर २०२२ मध्ये कंत्राटदारांची नेमणूक केली होती. या कामासाठी ए. बी. इन्फ्राबिल्ड लि. या कंपनीची निवड करण्यात आली होती. अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर वाढले आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेची मदत घेण्यात आली. व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले हे दोन्ही पूल जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या पुलाच्या खर्चात अधिक वाढही झाली.
PM Narendra Modi RSS : ‘आरएसएसला समजून घेणे सोपे नाही, त्यांचे कार्य समजून घेणे आवश्यक’
गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग सर्वसामान्य जनतेसाठी २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश सुरू आहे. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम एप्रिल महिना अखेरपर्यंत पूर्ण करून ३० एप्रिल २०२५ पासून गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.