मुंबई : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाटली बंद पाण्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, या पाण्याच्या शुद्धतेविषयी आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ बाटलीतून गार पाणी दिले जात असल्याचे काही सजग नागरिक सांगत आहेत.
नागरिक जे बाटलीबंद पाणी खरेदी करत आहेत, त्या बाटलीवर पाणी कधी भरले, ते शुद्ध आहे का, ते कधीपर्यंत वापरायचे आहे. याविषयी काहीच उल्लेख नसतो. काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात. अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात, त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. पाणी विक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.