Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईतील नॅशनल पार्कचा प्रवेश महागला, इतर सेवांच्या तिकिटांच्या दरातही १० टक्के वाढ

मुंबईतील नॅशनल पार्कचा प्रवेश महागला, इतर सेवांच्या तिकिटांच्या दरातही १० टक्के वाढ

मुंबई : रिक्षा, टॅक्सी आणि एसटीच्या भाड्यात आधीच सरकारने वाढ करून सर्वसामान्यांना अडचणीत टाकले होते, आता पर्यटकांच्या खिशावरही टोल घेतला आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क 94 रुपयांवरून 103 रुपये करण्यात आले आहे.तसेच इतर सेवांच्या तिकिटांच्या दरातही 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या तोंडावरच ही मोठी दरवाढ झाल्याने पर्यटकांची संख्या घटली आहे.

मुंबईकर रविवारी व सुट्टीच्या दिवशी नॅशनल पार्कमध्ये कुटुंबासह फिरायला जातात. मात्र, सरकारच्या या दरवाढीने त्यांच्या आनंदावर पाणी फेरले आहे. सध्या नॅशनल पार्कमध्ये प्रवेशासाठी 103 रुपये भरावे लागत आहेत. याशिवाय, लायन सफारी, टायगर सफारी, सायकलिंग आणि कान्हेरी गुंफा भेटीसाठी वेगळे तिकीट घ्यावे लागत आहे, आणि त्यांच्याही दरात 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी, प्रत्येक व्यक्तीला किमान 1000 रुपयांचा खर्च येत आहे, जो सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

यामुळे होळी, धूलिवंदन आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमध्येही नॅशनल पार्कमध्ये अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. उलट पर्यटकांची संख्या लक्षणीय घटली आहे. पर्यटन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सरकारची ही भूमिका पर्यटनासाठी ‘मारक’ ठरत आहे. दरम्यान, नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांसाठी सूचना पेटी ठेवण्यात आली आहे, जिथे पर्यटकांना सेवा व सुविधांबाबत अभिप्राय नोंदवता येतो. मात्र, याठिकाणी सरकारविरोधी संतप्त प्रतिक्रिया अधिक आढळत आहेत. वाढीव तिकीट दरामुळे नाराज पर्यटक सरकारवर टीका करत आहेत.

लहानग्यांचे आकर्षण असलेली ‘टॉय ट्रेन’ मागील चार वर्षांपासून बंद आहे. प्रशासनाने ही ट्रेन मे महिन्याच्या सुट्टीत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ट्रॅक व इतर कामे पूर्ण होण्यास अजून तीन-चार महिने लागतील, असे नॅशनल पार्कमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -