Sunday, August 24, 2025

वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन

वधूचे लग्नाच्या तिसऱ्या दिवशी दागिन्यांसह पलायन

जळगाव :  जळगावात एका तरुणाचे लग्न एजंटच्या मध्यस्थीने ठरवण्यात आले, मात्र नववधूने लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन घरातून पसार होत वरपक्षाची तब्बल २.४४ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात वधूसह एजंट आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर कॉलनीतील २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण कुटुंबासह राहतो. बराच काळ वधू न मिळाल्याने त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील एजंट आशाबाई हिच्याशी संपर्क साधला. आशाबाईने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, जि. यवतमाळ) ही मुलगी दाखवली आणि एकूण १.६० लाख रुपयांचा व्यवहार ठरला. १८ फेब्रुवारी रोजी एजंट आशाबाई, वधू पूजा गावडे, तिची आई निर्मलाबाई डोंगरे, मावसा शिवशंकर आणि मामा गोपाळ खंडारे हे तरुणाच्या घरी आले. दुसऱ्याच दिवशी १९ फेब्रुवारी रोजी तातडीने लग्न लावून देण्यात आले. पैसे मिळताच एजंट आणि वधूचे नातेवाईक लग्नमंडपातून निघून गेले.

२२ फेब्रुवारी रोजी रात्री सर्वजण झोपल्यानंतर वधू पूजा गावडे अचानक घरातून गायब झाली. सकाळी घरच्यांनी पाहिले असता, ती ८४ हजार रुपयांचे मणी-मंगळसूत्र, कर्णफुले आणि सोनपोत घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले.

तरुणाने एजंट आणि वधूच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे आणि शिवशंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment