Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखबलुचिस्तानचा असंतोष पाकिस्तानच्या मुळावर!

बलुचिस्तानचा असंतोष पाकिस्तानच्या मुळावर!

जो देश दुसऱ्या देशाविरोधात कायम अशांतता फैलावत असतो त्यालाही तशाच संकटांना सामोरे जावे लागते. पाकिस्तान इतकी वर्षे भारताविरोधात अशांतता फैलावत आहे आणि नाना कारवाया करत आहे. पाकिस्तानला आता जशास तसे कारवायांना सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानची अवस्था अगोदरच अत्यंत नाजूक आहे आणि यातच बलुचिस्तानातील दहशतवादी कारवायांना तो देश आळा घालू शकलेला नाही. त्यामुळे परवा बलुचिस्तानमध्ये तेथील दहशतावादी संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने त्या चिमुकल्या देशातील जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. ४५० प्रवासी रेल्वेत होते. त्यात अनेक सुरक्षा रक्षकही होते. बीएलए दहशतवाद्यांनी कथित स्फोटकांनी रेल्वे उडवून दिली आणि त्यात काही लोक आणि दहशतवादी ठार झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी बोगींवर गोळीबारही केला. बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या अंगावरील भळभळणारी जखम आहे आणि त्याला कारणही पाकिस्तानच आहे कारण पाकिस्तानने बलुचिस्तानला कधीही त्याचे न्याय हक्क दिले नाहीत. गेल्या २० वर्षांपासून बलुचिस्तानचा प्रश्न सतावत आहे आणि पाकिस्तानने त्यावर कधीही उपाय शोधलेला नाही. उलट पाकिस्तानने सारा वेळ भारताविरोधात काड्या करण्यात आणि आपल्या मांडीवर बसून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसण्यातच घालवला. त्यात आता बलुचिस्तानने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार केला असेल, तर त्या देशाची काही चूक नाही. बलुचिस्तान हा कित्येक वर्षे अशांत आणि अस्वस्थ आहे.

बलूच लिबरेशन आर्मीने त्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केला आहे त्याला आता वीस वर्षे झाली. पण त्यात अजूनही उपाय सापडलेला नाही. बलूच देशाकडून आतापर्यंत जे हल्ले करण्यात आले त्यांची जबाबदारी बीएलएने स्वीकारली आहे. बलुचिस्तान प्रश्नाचे मूळ त्याच्या पाकिस्तानच्या जवळकीत आहे. पाकिस्तानचा ४४ टक्के भूभाग असलेल्या बलुचिस्तान हा ब्रिटनकडून १९४७ मध्येच स्वतंत्र झाला. पण प्रामुख्याने बलूच लोकांना पाकिस्तानात सामील होण्यास भाग पाडण्यात आले. भारताची फाळणी होऊन बलूचला वेगळे काढण्यात आले पण बलूच लोकांच्या ते इच्छेविरोधात होते. त्यानतंर पाकिस्तानने बलूच लोकांवर सातत्याने अन्याय केला आणि जे बांगलादेशाचे झाले तेच बलुचिस्तानचे करू पाहिले. त्यामुळे बलुचिस्तान हा कायम अशांत भूभाग म्हणून राहिला. असंख्य बलूच लोकांना इच्छा नसतानाही पाकिस्तानात सामील होण्यास भाग पाडण्यात आले. त्याचा असंतोष त्यांच्या मनात आजही आहे. बलूचवर आपला ताबा प्रस्थापित करण्यासाठी इस्लामाबादने म्हणजे पाकिस्तानने तेथे जबरदस्तीने अनेक अत्याचार केले. आक्रमणे केली आणि तेथील भूभाग घशात घालू पाहिला. बीएलएने पाकिस्तान विरोधात शस्त्रे उचलून आणि संघर्ष सुरू करून आता २० वर्षे लोटली आहेत. पण प्रश्न तसाच आहे. गेली दश वर्षे बलुचिस्तानने अनेक उठाव पाहिले आहेत आणि सध्याची स्थिती ही त्या उठावांचे एक प्रकारे दर्शन आहे. हा प्रांत अनेक वर्षे बलूच लोकांवर जो अन्याय झाला आणि स्थानिकांची दडपशाही झाली त्याविरोधात लोकांनी उठवलेला आवाज आहे. तो आता पाकिस्तानला दडपता येणार नाही असे दिसते आहे. बलूच लिबरेशन आर्मीने केलेल्या जाफर एक्स्प्रेसच्या अपहरणामुळे आणि त्यात अनेक प्रवासी ठार झाल्याच्या घटनेने पाकिस्तान हादरला आहे. आधीच पाकिस्तानची हालत अतिशय वाईट आहे. अमेरिकेने मदत बंद केली आहे आणि इतर देशांकडे तोंड वेंगाडण्याची सोय नाही. त्यातच देशात निर्माण झालेले हे संकट पाकिस्तानला अस्वस्थच नव्हे, तर विषण्ण करणारे आहे. पण त्याचे आपल्याला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही, कारण जसे पेरावे तसे उगवते हा न्याय आणि त्यानुसार आता पाकिस्तानच्या नशिबी जे आले आहे ते पाकिस्ताननेच पूर्वी आपसूकच ओढवून घेतले आहे.

बलुचिस्तान हा प्रांत खरे तर खनिज संपत्तीने अत्यंत समृद्ध आहे. पण पाकिस्तानने त्या प्रांतावरही अन्याय केला आणि आज तो प्रांत प्रचंड धूमसतो आहे. चीनचे अनेक प्रकल्प याच भागात आहेत. यंदा बलुचिस्तानातील हल्ले आणखी कडक झाले आहेत आणि त्याविरोधात पाकिस्तान लष्कर काहीही करू शकत नाही अशी स्थिती आहे. पाकिस्तानला आधीच स्वतःच्या संकटांशी तोंड देताना नाकी नऊ येत आहेत. त्यात आता हे संकट त्याने ओढवून घेतले आहे. पाकिस्तानने आता तीव्र धोरण आखले असले तरीही त्याच्याकडे फारसे पर्याय नाहीत. कारण बलुचिस्तान हा मोठा प्रांत आहे आणि लोकसंख्या विभागलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान हतबल ठरला आहे. पाक सरकार संपूर्ण सुरक्षा देऊ शकत नाही आणि त्यामुळे पाकिस्तानची अडचण झाली आहे. मध्यंतरी पाकिस्तानने बलुचिस्तान पेटवल्याबद्दल भारतावर आरोप करून पाहिले. पण त्यावर कुणाचाही विश्वास बसला नाही. कारण भारताचा अशा गोष्टींवर विश्वास नाही हे साऱ्या जगाला माहीत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बोंबा या कागदावरच राहिल्या. त्याला अगदी अमेरिकेनेही मनावर घेतले नाही. बलुचिस्तानची सीमा लागून आहे ती अफगाणिस्तानला. त्यामुळे त्या देशाविरोधात पाकिस्तान काहीही शकत नाही. कारण अफगाणिस्तानचे पाकिस्ताशी किती शत्रुत्वाचे संबंध आहेत हे साऱ्यांनाच माहीत आहे, पण पाकच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बलूच दहशतवाद्यांची वाढती ताकद. आणि बीएलए ही सर्वात संघटित शक्ती आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्याविरोधात लढणे अवघड जात आहे. सर्वात अवघड सवाल हा आहे पाकिस्तानने नेहमीच बलुचिस्तानला आपल्या दबावावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. पण बलूच लोक आता जागृत झाले आहेत आणि ते कुणाच्या दडपणाला बळी पडणार नाहीत. बलूच दहशतवाद्यांना मदत शेजारील अफगाणिस्तानकडून मिळते आहे असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांकडून संघर्षाला सामोरे जात आहे आणि ही स्थिती त्याला अधिकच खड्ड्यात घालणारी आहे. पाकिस्तान आता भोगतो आहे आणि जे त्याने भारताच्या नशिबी एकेकाळी लिहिले होते. पण भारत त्यातून अंगभूत सामर्थ्याने बाहेर आला आणि आता पाकिस्तानपेक्षा कितीतरी ताकदवान आहे. पाकिस्तान मात्र नव्या खाचखळग्यात सापडत आहे आणि हेच त्याचे प्राक्तन आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -